निवासी हॉटेल, व्यापारी संकुले आजपासून सुरू

SAKHI NEWS LIVE:-

पिंपरी: राज्यशासनाने टाळेबंदी शिथिल करताना दिलेल्या सुधारित आदेशानुसार बुधवार, ५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवड शहरातील मॉल, व्यापारी संकुले, निवासी हॉटेल, अतिथिगृहे, लॉज सुरू होणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध मात्र कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यशासनाने टाळेबंदी शिथिल करताना काही सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, पिंपरी पालिकेने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. शहरातील मॉल, व्यापारी संकुले बुधवारी सकाळी ९ पासून सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. मात्र, त्यातील सिनेमागृहे, उपाहारगृहे बंदच राहणार आहेत. मात्र, फूड कोर्ट, रेस्टॉरन्टमधील  घरपोच सेवा सुरळीत राहील. हॉटेल, लॉजिंग, अतिथिगृहांमधील निवास व्यवस्था सेवा ३३ टक्के मर्यादेत सुरू ठेवता येणार आहेत. मात्र, ज्या हॉटेलमध्ये करोना रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण तथा अलगीकरण केले जात आहे, त्या ठिकाणी १०० टक्के निवास व्यवस्था ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, निवासी हॉटेलमधील उपाहारगृहे केवळ तेथे राहणाऱ्या प्रवाशांसाठी सुरू ठेवता येणार आहेत.

शहरभरातील बाजारपेठांमधील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार आहेत. सम, विषम तारखेनुसार दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या सर्व अटी, सूचनांचे पालन करणे बंधनकारक असून त्याचे उल्लंघन करण्यात आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.