*शहरवासीय लाभार्थीसाठी नागरवस्ती विभागाच्या योजनांची फाॅर्म मुदत२५ नोव्हेंबर अखेर वाढवली*

महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा नागरीकांनी लाभ घ्यावा

पिंपरी महापालिका इमारत
पिंपरी प्रतिनिधी sakhi news live

पिंपरी :‐ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत महिला बालकल्याण, मागासवर्गीय, दिव्यांग कल्याणकारी आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून महानगरपालिका हद्दीतील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

या योजनांसाठी अर्ज वाटप आणि स्विकृती दि. २७ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत होणार आहे. अर्ज वाटप आणि स्विकृती महानगरपालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी होईल. सर्व अर्ज मोफत मिळणार असून या अर्ज स्विकृतीवेळी २० रुपये शुल्क आकारण्यात येईल.

महिला बालकल्याण योजनेअंतर्गत विधवा व घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य, इयत्ता १० वी मधील मुलींना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी अर्थसहाय्य, इयत्ता १० वी नंतर (आयटीआय मधील) मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदाविका अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य, दीड वर्षे पुर्ण झालेल्या महिला बचतगटास अर्थसहाय्य, मुलगी दत्तक घेणा-या दाम्पत्यास अर्थसहाय्य या योजनांचा समावेश आहे.

अस्तित्व पुनर्वसन योजनेअंतर्गत पीडीत महिलांना अर्थसहाय्य केले जाईल. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर अथवा पहिली मुलगी असताना दुसरी मुलगी झाल्यास दुस-या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणा-या महिलेस अर्थसहाय्य, रामभाऊ म्हाळगी मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य योजना, परदेशातील उच्चशिक्षण/अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या युवतींना अर्थसहाय्य, १० वर्षे पूर्ण झालेल्या महिला बचतगटांना अर्थसहाय्य, इयत्ता १२ वी नंतर वैद्यकीय ( MBBS, BAMS, BHMS, BDS, BUMS), MBA आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षा यासारखे उच्च शिक्षण घेणा-या युवतींना अर्थसहाय्य अशा योजनांचा समावेश आहे.

मागासवर्गीय कल्याणकारी योजनेअंतर्गत इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिकणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. इयत्ता १२ वी नंतर वैद्यकीय (MBBS, BAMS, BHMS, BDS, BUMS), MBA आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षा यासारखे उच्च शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विद्यार्थांना अर्थसहाय्य, मागासवर्गीय युवकांना परदेशातील उच्चशिक्षणासाठी अर्थसहाय्य या योजना असतील.

पंडित दीनदयाळ उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत दिव्यांगांना उपयुक्त साधनांसाठी अर्थसहाय्य केले जाणार आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतर वैद्यकीय (MBBS, BAMS, BHMS, BDS, BUMS), MBA आणि अभियांत्रिकी पदवी परिक्षा यासारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य योजना, विशेष (मतिमंद) व्यक्तींचा सांभाळ करणा-या संस्थेस अथवा पालकांस अर्थसहाय्य या योजना असतील. तर संत गाडगे महाराज दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाहासाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय इयत्ता १ ली ते पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेणाऱ्या महापालिका हद्दीतील अनाथ आणि निराधार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना यांचा समावेश आहे.

याशिवाय इतर कल्याणकारी योजनेअंतर्गत इयत्ता १० वी मध्ये ८० ते ९० टक्के गुण मिळविणारे गुणवंत विद्यार्थी, इयत्ता १० वी मध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे गुणवंत विद्यार्थी, इयत्ता १२ वी मध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे गुणवंत विद्यार्थी यांनाही आर्थिक लाभ दिला जाणार आहे. तसेच एचआयव्ही आणि एड्स बाधित मुलांचा सांभाळ करणा-या पालकांना आणि संस्थांना अर्थसहाय्य दिले जाईल.

सर्व योजना महानगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी आहेत. अधिक माहितीसाठी नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्याशी ९८५०७२७३२० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.