सक्ती नसलेल्या ‘आरोग्य सेतू’ अॅपची उपाहारगृहांकडून अंमलबजावणी
SAKHI NEWS LIVE:-
उपाहारगृहांमध्ये जाणारे ग्राहक त्रस्त
पुणे : ‘आरोग्य सेतू’ अॅपची सक्ती नसतानाही त्याची अंमलबजावणी होत असल्याने उपाहारगृहांमध्ये जाणारे ग्राहक त्रस्त झाले आहेत. हे अॅप डाउनलोड करणाऱ्यांनाच उपाहारगृहामध्ये प्रवेश देण्याच्या प्रकारामुळे ग्राहकांबरोबरच उपाहारगृहचालकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेने आरोग्य सेतू अॅपची सक्ती केलेली नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र ग्रामीण भागात अॅप सक्तीचे केल्यामुळे दोन प्रशासनाच्या धोरणांतील विसंगती समोर आली आहे.
टाळेबंदीच्या तब्बल साडेसहा महिन्यांनंतर शहरातील उपाहारगृहे सुरू झाली आहेत. मात्र, उपाहारगृह सुरू करताना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) ग्राहकाच्या शरीराची तपासणी करण्याबरोबरच ग्राहकाने आपल्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाउनलोड केले आहे का आणि केले असल्यास ते अद्ययावत आहे का, याची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांची काही उपाहारगृहचालकांनी अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे उपाहारगृहामध्ये भोजनासाठी जाणाऱ्या नागरिकांना आरोग्य सेतू अॅपचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सक्ती करता येणार नाही..
महापालिकेने जारी केलेल्या आदेशात उपाहारगृह व्यावसायिकांसाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य सेतू अॅपसंदर्भात काही आदेश नाहीत. पर्यटन विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्येही आरोग्य सेतू अॅपचा उल्लेख नाही. पण, राज्य शासनाने यापूर्वी दिलेल्या आदेशात आरोग्य सेतू वापर करावा, अशी सूचना आहे. मात्र, तशी सक्ती करता येणार नाही. महापालिकेकडून नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत असली, तरी आरोग्य सेतू अॅप नसल्यामुळे कारवाई करावी, अशी कोणतीही सूचना दिलेली नाही, असे पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुनील इंदलकर यांनी सांगितले.
उपाहारगृह व्यावसायिकांसाठी राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य सेतू अॅप वापरण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसारच जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागासाठी मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या आहेत.
– विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी
उपाहारगृहामध्ये प्रवेश करणाऱ्या ग्राहकांनी आरोग्य सेतू अॅप डाउनलोड केले आहे का याची तपासणी बंधनकारक नाही.
– गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट्स अँड हॉटेलियर्स असोसिएशन
आरोग्य सेतू अॅपबाबत पोलिसांनी कोणतेही आदेश दिलेले नाहीत.
-डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त