पिंपरी चिंचवडबातम्या

खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांतील ९ हजार ५०० हून अधिक कुटुंबांना ‘मदतीचा हात’

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त एक हात मदतीचा उपक्रम
शहर भाजपातर्फे सेवाकार्याचा अहवाल भाजपा प्रदेश नेतृत्वाकडे सुपूर्द

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
भाजप नेते तथा आमदार महेशदादा किसनराव लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांतील आदिवासी पट्टा व दुष्काळग्रस्त भागांमधील ९ हजार ५०० हून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे किट देण्यात आले. आमदार लांडगे यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेने ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ हा उपक्रम राबविला. या सेवाकार्याचा लेखी अहवाल भाजपचे प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाचे संयोजक विक्रम पावसकर यांना सुपूर्द करण्यात आला.

‘समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचावी’ या उद्देशाने शहरातील नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहभागातून गावनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. विकास डोळस आणि संजय पटनी यांनी उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. मदत किट वाटपासोबतच रक्तदान शिबिरे, पशुधनासाठी चारा वाटप, कीर्तन व प्रबोधनपर कार्यक्रम आणि अनाथ बालकांना मदत यांचाही समावेश कार्यअहवालात आहे.

अहवाल सुपूर्द करताना भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, उपक्रम समन्वयक विकास डोळस व संजय पटनी, वैशाली खाड्ये, मधुकर बच्चे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, दक्षिण भारत आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राजेश पिल्ले आणि ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शितल शिंदे आदी उपस्थित होते.

उपक्रम समन्वयक विकास डोळस म्हणाले की, “आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गम गावांतील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवण्याचा संकल्प केला. स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने गावनिहाय नियोजन केल्यामुळे तीन तालुक्यांतील ९ हजार ५०० हून अधिक कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक साहित्य पोहोचवता आले.”

उपक्रम समन्वयक संजय पटनी म्हणाले की, “महेशदादांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांना लोकसेवेची जोड देण्यासाठी अनेक सहकाऱ्यांनी गावोगावी जाऊन काम केले. मदत किट वाटप, रक्तदान आणि चारा वाटप यांसारख्या उपक्रमांची नोंद असलेला कार्यअहवाल आम्ही प्रदेश नेतृत्वाकडे सुपूर्द केला. या कामासाठी वेळ आणि श्रम देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचे मनापासून आभार व्यक्त करीत आहोत.”

“आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांतील दुर्गम गावांपर्यंत मदत पोहोचवली. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने आदिवासी आणि दुष्काळग्रस्त भागांतील ९ हजार ५०० हून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य देता आले. या सामूहिक सेवाकार्याचा अहवाल आम्ही प्रदेश नेतृत्वाकडे सुपूर्द केला आहे. ‘सेवा ही संघटन’ हा पक्षाचा विचार गावोगावी कृतीतून पुढे नेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो.”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.