पिंपरी चिंचवडबातम्या

चार चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी वॉचमनला पाच वर्षांची सक्तमजुरी!

मोशी येथील सोसायटीतील प्रकरणात विशेष पोक्सो न्यायालयाचा निकाल
आमदार महेश लांडगे यांनी ‘फास्ट ट्रॅक’ न्याय देण्याची केली होती मागणी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
मोशी परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीत लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वॉचमन दिनेश बाबूराम चौधरी (वय २४) याला पिंपरी येथील विशेष पोक्सो न्यायालयाने दोषी ठरवले. जिल्हा न्यायाधीश-३ तथा विशेष न्यायाधीश संजय एन. यादव यांनी शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी हा निकाल देत त्याला जास्तीत जास्त पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. गुन्हा घडल्यापासून अवघ्या साडेपाच महिन्यांत खटल्याचा निकाल लागला आहे.

दि. ८ मे २०२६ रोजी दुपारी सोसायटीच्या पार्किंगमध्ये चार अल्पवयीन मुली खेळत होत्या. “पाण्याची टाकी दाखवतो,” असे सांगून आरोपीने त्यांना लिफ्टने इमारतीच्या गच्चीकडे नेले. तिघींना जिन्यात थांबवून त्याने एका मुलीला एकटीला गच्चीवर नेले आणि तिथे तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर जिन्यात थांबलेल्या इतर मुलींनाही त्याने अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. एका मुलीला “खाऊसाठी पैसे देतो” असे सांगून खाली जाऊन कोणी येत आहे का, ते पाहण्यास पाठवले. मुलींनी घरी जाऊन आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर एका पीडितेच्या वडिलांनी इतर पालकांसह भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच दिवशी गुन्हा (क्र. २४१/२०२६) दाखल झाला आणि आरोपीला ९ मे रोजी अटक करण्यात आली. तसेच, त्या नराधमाची धिंडही काढण्यात आली होती.

दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेतली होती आणि सदर प्रकरणात फास्टट्रॅक न्यायालयामध्ये खटला चालवावा. आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली होती.

तपास अधिकारी मनीषा जगन्नाथ दशवंत यांनी तपास करून ४ जून रोजी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात फिर्यादीसह सहा साक्षीदार तपासले गेले, त्यात चारही पीडित मुलींचा समावेश होता. मुलींची साक्ष एकमेकींशी सुसंगत असून विश्वासार्ह वाटते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. बालसाक्षीदारांच्या साक्षीची काळजीपूर्वक तपासणी आवश्यक असते, मात्र या प्रकरणात चारही साक्षी एकमेकींना पुष्टी देतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपीने कलम ३५१ (बीएनएसएस) अन्वये नोंदवलेल्या जबाबात मुलीची साक्ष खरी असल्याचे मान्य केले, ही बाब न्यायालयाने त्याची अप्रत्यक्ष कबुली मानली.
*****

आरोपीबाबत सहानुभूती नाहीच…!

न्यायालयाने आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम ७५(१) अन्वये २ वर्षे, पोक्सो कलम ८ अन्वये ३ वर्षे, कलम १० (गंभीर लैंगिक अत्याचार) अन्वये ५ वर्षे आणि कलम १२ अन्वये २ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. प्रत्येक कलमाखाली २ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला; दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल. सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या असल्याने प्रत्यक्षात आरोपीला पाच वर्षांचा कारावास भोगावा लागेल. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील एस. एम. चौगुले यांनी गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता जन्मठेपेची मागणी केली. बचावपक्षातर्फे ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी आरोपीवर आधी कोणताही गुन्हा नसल्याचा मुद्दा मांडून सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती केली. मात्र, पीडित मुली १२ वर्षांखालील असल्याने आरोपी कोणत्याही सवलतीस पात्र नाही, अशा गुन्ह्यांत शिक्षा प्रतिबंधक असणे आवश्यक आहे, असे नमूद करून न्यायालयाने सवलत नाकारली.
*****


“लहान मुलींवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. ज्या वॉचमनवर सोसायटीतील कुटुंबांनी विश्वास ठेवला, त्यानेच असे कृत्य करणे अत्यंत संतापजनक आहे. न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावल्याने अशा प्रवृत्तींना जरब बसेल. अवघ्या साडेपाच महिन्यांत निकाल लागल्याने पीडित कुटुंबांना न्याय मिळाला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आणि न्यायालयाचे मनापासून आभार. सोसायटींनी सुरक्षारक्षकांची पार्श्वभूमी तपासूनच नेमणूक करावी आणि मुलांच्या सुरक्षेबाबत सजग राहावे, असे आवाहन या निमित्ताने करीत आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.