राज्यभरातील शाळांमध्ये ‘एक दिवस शाळेसाठी’

Sakhi News Live:-

राज्यातील शाळांसाठी ‘शाळासिद्धी’सारखा उपक्रम आधीच अस्तित्वात असताना शालेय शिक्षण विभागाने एक दिवस शाळेसाठी हा आणखी एक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत शासकीय यंत्रणेतील वर्ग एक आणि वर्ग दोनचे अधिकारी महिन्यातून एकदा शाळेला भेट देऊन शाळेतील सोयीसुविधांचे मूल्यमापन करून मूलभूत त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्याबाबत सूचना देणार आहेत.

एक दिवस शाळेसाठी या उपक्रमाबाबत शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार हा उपक्रम विभागीय आयुक्त स्तरावर संनियंत्रित केला जाणार आहे. या उपक्रमात अधिकाऱ्यांना एका वर्षांत किमान तीन शाळांना भेट द्यावी लागणार आहे. शाळेला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद शाळांतील प्रवेश वाढवण्याबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा भेटीमध्ये भौतिक सुविधा, क्रीडा साहित्य, स्वच्छतागृह, शालेय पोषण आहार यांचे मूल्यमापन करून त्याबाबतचा अहवाल सादर करायचा आहे. या उपक्रमात शालेय शिक्षण विभागासह पंचायत राज, ग्रामविकास, महसूल विभाग यांचाही सहभाग असेल असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी अनेकदा असे उपक्रम राबवण्यात आले आहेत. शाळासिद्धीसारखा उपक्रम अजूनही सुरू आहे. असे असताना एक दिवस शाळेसाठी या उपक्रमाची भर पडणार आहे. तसेच सध्या करोना संसर्गामुळे शाळा बंद असताना हा उपक्रम कसा राबवणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

नगरपालिका, महापालिका शाळांचाही समावेश व्हावा!

राज्यात जिल्हा परिषद शाळांप्रमाणेच नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्याही शाळा आहेत. मात्र एक दिवस शाळेसाठी या उपक्रमात या शाळांना समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे शाळांच्या विकासासाठी, पटसंख्या वाढवण्यासाठी या उपक्रमात नगरपालिका, महानगरपालिका शाळांनाही समाविष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे.