पिंपरी चिंचवडबातम्या

दुर्गादेवी टेकडीवरील २२७ वृक्ष वाचवण्यासाठी चिपको आंदोलन

बंद वॉटर पार्क किंवा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या जागेवर टाकी उभारण्याची मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यावरणाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या दुर्गादेवी टेकडीवरील २२७ वृक्ष पाण्याच्या टाकीसाठी तोडण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी नागरिकांनी चिपको आंदोलन केले. सकाळी ८ ते १० या वेळेत नोटीस लावण्यात आलेल्या झाडांना मिठी मारून आंदोलकांनी वृक्षतोडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नियोजित पाण्याची टाकी दुर्गादेवी टेकडीऐवजी बंद असलेल्या वॉटर पार्क अथवा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या जागेवर उभारावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दुर्गादेवी टेकडी ही पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी निसर्गाचे वरदान आहे. शहराच्या विविध भागांतील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी पहाटेपासून या ठिकाणी फिरण्यासाठी, योगासने आणि व्यायामासाठी येतात. टेकडीवरील वृक्षांमुळे परिसरात शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि शहराचा पर्यावरणीय समतोल राखण्यात या हरित क्षेत्राचे महत्त्व मोठे आहे.

यावेळी मारुती भापकर म्हणाले की, दुर्गादेवी टेकडीवर पाण्याची टाकी उभारण्यासाठी २२७ वृक्ष तोडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रशासनाने लावलेल्या नोटिशीमुळे नागरिकांना पुरेसा वेळ मिळणार नाही, अशा पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पाण्याच्या टाकीसाठी पर्यायी जागा उपलब्ध असताना टेकडीवरील वृक्षतोडीचा आग्रह कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ताधारी पक्षांकडून आर्थिक लाभाच्या अपेक्षेने विकासाच्या नावाखाली वृक्षतोडीला प्राधान्य दिले जात असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील विविध जलविद्युत प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीचे प्रस्ताव आणि मंजुरी दिली जात असल्याचा उल्लेख करत त्यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत चिंता व्यक्त केली. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणाचे हृदय असलेल्या दुर्गादेवी टेकडीवरील वृक्षतोडीचा निर्णय मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.

टाकीसाठी पर्यायी जागेचा विचार करा

दुर्गादेवी टेकडीवरील वृक्षसंपदा वाचविण्यासाठी महापालिकेने बंद वॉटर पार्क किंवा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या जागेवर उंच पाण्याची टाकी उभारण्याचा पर्याय तपासावा. प्रस्तावित कामासाठी २२७ पेक्षा अधिक वृक्ष बाधित होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे मोठ्या संख्येने हरकती व सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन भापकर यांनी केले.

महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा केवळ औपचारिकपणे विचार करून वृक्षतोडीला प्राधान्य दिल्यास शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, महिला आणि विद्यार्थ्यांना एकत्र करून व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या चिपको आंदोलनात भगवान पठारे, निलेश शिंदे, जितेंद्र चावडा, कोळी मामा, बाबा मोहिते, रोकडे गुरुजी, प्रशांत मातेरे, भावेश पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि महिला सहभागी झाल्या होत्या. ‘झाडे वाचवा, ऑक्सिजन वाचवा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी वृक्षतोडीला विरोध दर्शविला.