*‘संविधान सन्मान दौड’मधून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश- आमदार शंकर जगताप*
*संविधानाच्या सन्मानासाठी धावले पिंपरी-चिंचवडकर!*
-आमदार शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजन
-चिंचवड ते भीमसृष्टी ‘संविधान सन्मान दौड’

पिंपरी, २६ नोव्हेंबर(प्रतिनिधी) : संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडकरांनी गुरुवारी सकाळी चिंचवड ते पिंपरी अशी ‘संविधान सन्मान दौड’ पूर्ण केली. आमदार शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दौडमधून संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये दैनंदिन जीवनात जपण्याचा संदेश देण्यात आल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

चिंचवडमधील क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मारक चौकातून गुरुवारी सकाळी सात वाजता दौडला सुरुवात झाली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भीमसृष्टी येथे दौडचा साडे दहा वाजण्याच्या सुमारास समारोप झाला. आज दौड निमित्ताने हजारो जणांनी सहभाग घेतला. यावेळी महापौर रवी लांडगे, आमदार अमित गोरखे, उमा खापरे, उपमहापौर शैलजा बाबर, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी महापौर तुषार हिंगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच नगरसेवक, पदाधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
या निमित्ताने बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले. त्या दिवसाचे स्मरण करतानाच संविधानाने दिलेले अधिकार आणि नागरिक म्हणून आपली कर्तव्ये यांची जाणीव वाढवणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. मतभेद असले तरी एकमेकांच्या मताचा आदर करणे आणि प्रत्येकाला समानतेने वागवणे, यातून संविधानाची मूल्ये रोजच्या व्यवहारात उतरतात, हा विचार दौडीच्या निमित्ताने अधोरेखित करण्यात आला.
………..
प्रतिक्रिया:
“संविधानाचा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहू नये. लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक नागरिकाचे म्हणणे ऐकणे आणि कोणताही भेदभाव न करता त्याचे प्रश्न सोडवणे, ही माझी जबाबदारी आहे. आज आपण संविधानासाठी एकत्र धावलो; आता समता आणि बंधुता आपल्या रोजच्या वागण्यात जपूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तेच खरे अभिवादन ठरेल.”
शंकर जगताप
आमदार, चिंचवड विधानसभा.
