खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची उत्तरप्रदेश सहप्रभारीपदी निवड

पुणे : संसदीय स्थायी समितीच्या (विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल) अध्यक्षा व राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांची उत्तरप्रदेश सहप्रभारीपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आगामी विधानसभा निवडणूक आणि २०२९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन पक्षसंघटनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
भाजपने नुकतीच आपली नवीन प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर केली. त्यामध्ये उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाची सूत्र विनोद तावडे यांच्याकडे, तर सहप्रभारी पदाची सूत्र प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. राज्यसभेची पहिलीच टर्म असलेल्या प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी संसदेत सक्रिय सहभाग नोंदवतात. तसेच सर्वच आघाड्यांवर उल्लेखनीय व लोक-देशहिताचे मुद्दे मांडत प्रभावी कामगिरी करतात. या कामगिरीबद्दल मेधा कुलकर्णी यांना नुकताच ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना सलग दुसऱ्यांदा मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रभारीपदी बैजयंत जय पांडा यांची तर सहप्रभारीपदी अमित मालवीय, सदानंद तानावडे, कमलजीत सहरावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आपल्यावर सोपवलेल्या नवीन जबाबदारीविषयी बोलताना डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “या निवडीबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष आणि उत्तरप्रदेश प्रभारी विनोद तावडे यांचे मनापासून आभार मानते. माझ्यावर सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आणि विश्वास दाखवला, हा विश्वास सार्थ करण्याचा निश्चित प्रयत्न करेन. उत्तरप्रदेशमध्ये सहा क्षेत्र असून, नक्की कोणती जबाबदारी माझ्यावर सोपवणार याबाबत मला उत्सुकता आहे. मुख्यमंत्री योगीजींच्या कार्यकाळात उत्तरप्रदेशचा विकास सुरू आहे. येणाऱ्या काळात अधिक चांगल्या पद्धतीने उत्तर प्रदेशचा विकास होईल. यामध्ये माझा सहभाग असेल याचा मला विशेष आनंद आहे.”
प्रा. कुलकर्णी यांनी रेल्वे, महिला सुरक्षा, आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, कॉर्पोरेट जिहादच्या संबंधित विषयांवर संसदेमध्ये सातत्याने मुद्देसूद भाष्य केले आहे. विशेष सत्रात, झिरो अवर, प्रश्नोत्तरे व विविध विषयांवरील चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी महिला सुरक्षा, विमा सुरक्षा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, आधार प्रमाणीकरण, आरटीई प्रवेश प्रक्रिया, शेतजमिनी याबाबत लक्षवेधी मांडल्या.
