शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते उद्घाटन
निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर १३३ शाळांचा सहभाग

पिंपरी, दि. १७ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांना गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी मदनलाल धिंग्रा मैदान, निगडी प्राधिकरण येथे उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य विकसित होण्यासोबतच त्यांच्यात संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि खेळाडूवृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत एकूण १३३ शाळांनी सहभाग नोंदविला आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी क्रीडा अधिकारी दीपक कन्हेरे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा पर्यवेक्षक श्रीमती ऐश्वर्या साठे यांनी केले.

या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमुळे शालेय विद्यार्थ्यांना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले असून, विविध शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
—
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये क्रीडा क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्यास त्यांच्या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळते. या क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने खेळत आपले सर्वोत्तम कौशल्य दाखवावे आणि भविष्यात शहराचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे.
— शर्मिलाताई बाबर, उपमहापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
