पिंपरी चिंचवडबातम्या

पिंपरी-चिंचवडला डेंग्यूचा विळखा? तब्बल २,२६१ घरांमध्ये आढळल्या डासांच्या अळ्या

शहरासह परिसरात वातावरणातील बदलामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकल्यासह मलेरिया, डेेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. शहरात आतापर्यंत मलेरियाचे १९, डेंग्यूचे ४० सकारात्मक रुग्ण आढळले आहेत.

पिंपरी : डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने महापालिकेने केलेल्या तपासणीत दोन हजार २६१ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. त्या कुटुंबांना नोटीस बजावून सहा लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागाच्या वतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कंटेनर सर्वेक्षण केले जात आहे. जूनपासूनच्या सर्वेक्षणात शहरातील दोन लाख ९४ हजार १८६ घरांची आणि १४ लाख ५२ हजार ७२५ कंटेनरची तपासणी केली. दोन हजार २६१ घरांमध्ये आणि दोन हजार ४२८ कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.

एक हजार २७२ टायर आणि भंगार दुकाने, एक हजार ३६८ बांधकामांची तपासणी करून तीन हजार ७८४ कंटेनर रिकामे केले, तर दोन हजार ३८१ कंटेनरमध्ये औषध टाकण्यात आले. यामधील दोन हजार २४८ जणांना नोटीस दिली. डास आढळलेल्या घरगुती आणि व्यावसायिक मालमत्तांकडून सहा लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. घरे एक हजार, व्यावसायिक आस्थापनांना दोन हजार, तर मॉल, रुग्णालय, बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना दहा हजारांचा दंड आकारण्यात येतो, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
डेंग्यूच्या डंखात वाढ
शहरासह परिसरात वातावरणातील बदलामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकल्यासह मलेरिया, डेेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. शहरात आतापर्यंत मलेरियाचे १९, डेंग्यूचे ४० सकारात्मक रुग्ण आढळले आहेत.

नागरिकांनी पाणी साठवून ठेवू नये. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. डेंग्यूचे डास, अळ्यांची पैदास स्वच्छ पाण्यातच होते. त्यामुळे फ्लॉवर पॉट, फ्रीजच्या मागील ट्रे, भंगार, टायरमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले आहे.

ताप किंवा श्वसनाशी संबंधित लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता जवळच्या महापालिकेच्या दवाखाना किंवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. पोषक व संतुलित आहार घ्यावा, पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी, शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी भरपूर पाणी प्यावे. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, तसेच हिरव्या पालेभाज्यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आराेग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले.