“टेंडर काढून टक्केवारी हवी असेल तर भीक मागून गोळा करून देतो; पण विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करून शालेय साहित्य द्या!”
प्रशासनाचा डीबीटीचा पारदर्शक प्रस्ताव भाजप नगरसेवकांनी फेटाळला; ठेकेदारांच्या फायद्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ – आमआदमी पार्टी युवक आघाडीचा आरोप

पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील सुमारे ६० हजार गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदीसाठी ‘डीबीटी’ (DBT) द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा पारदर्शक आणि विद्यार्थीहिताचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने (आयुक्तांनी) तयार केला होता. मात्र, विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा झाल्यास टेंडर, मध्यस्थी आणि कमिशनखोरीला वाव राहणार नाही, या स्वार्थातून भाजपच्या सत्ताधारी नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव फेटाळून लावला. मर्जीतील ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टी युवक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी केला आहे.
आम आदमी पार्टीने १९ जुलै २०२६ रोजी महापालिका आयुक्तांना ई-मेलद्वारे निवेदन देऊन, सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द करून विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे तातडीने रक्कम वर्ग करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत २४ कोटी ९७ लाख रुपयांचा डीबीटी प्रस्ताव तयार केला. मात्र, स्थायी समितीने हा प्रस्ताव फेटाळून ई-रुपी आणि ठेकेदारीच्या माध्यमातून प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला.
शाळा सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला असतानाही ६० हजार विद्यार्थी आजही शालेय साहित्यापासून वंचित आहेत. प्रशासनाची इच्छा असूनही केवळ ठेकेदारधार्जिण्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
यावेळी रविराज काळे म्हणाले,
“टेंडर काढून टक्केवारी हवी असेल तर ती आम्ही भीक मागून गोळा करून देऊ; पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ करू नका. विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे रक्कम जमा करा आणि त्यांना तातडीने शालेय साहित्य उपलब्ध करून द्या.”
आम आदमी पार्टी युवक आघाडीची मागणी आहे की, स्थायी समितीने घेतलेला ठेकेदारधार्जिणा निर्णय तातडीने रद्द करून प्रशासनाच्या मूळ डीबीटी प्रस्तावाला मंजुरी द्यावी आणि विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करावी.
अन्यथा, “टेंडरसाठी टक्केवारी हवी असेल तर आम्ही भीक मागून ती गोळा करून देतो,” हा संदेश देत आम आदमी पार्टी युवक आघाडीच्या वतीने महापालिका भवनासमोर ‘भीक मागो आंदोलन’ करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड करणाऱ्या या निर्णयाविरोधात तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही रविराज काळे यांनी दिला.
आम आदमी पार्टी युवक आघाडीच्या प्रमुख मागण्या :
विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे तात्काळ रक्कम जमा करावी.
ई-रुपी व ठेकेदारीची प्रक्रिया त्वरित रद्द करावी.
विद्यार्थ्यांना तातडीने शालेय साहित्य उपलब्ध करून द्यावे.
या दिरंगाईला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी.
