पिंपरी चिंचवडबातम्या

जय भवानी मित्र मंडळाच्या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुष्मा जराड प्रथम; लता महंकाळे द्वितीय, सारिका तावरे तृतीय

पिंपरी :महिलांच्या कलागुणांना आणि सुप्त गुणांना वाव मिळावा, तसेच रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या उद्देशाने जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पावसाचे वातावरण असतानाही शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला.

स्पर्धेचे सूत्रसंचालन संदेश पारकर आणि रोहन कांबळे यांनी खुमासदार शैलीत केले. हास्यविनोद, मनोरंजक प्रश्न, उखाणे तसेच विविध खेळांमधून स्पर्धेला रंगत आली. योग्य उत्तरे देणाऱ्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. स्पर्धा जसजशी पुढे सरकत गेली, तसतशी स्पर्धकांमधील चुरस आणि उपस्थित महिलांमधील उत्साह वाढत गेला.

स्पर्धेत सौ. सुष्मा जराड यांनी प्रथम क्रमांक, सौ. लता महंकाळे यांनी द्वितीय क्रमांक, तर सौ. सारिका तावरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना नगरसेविका अर्चनाताई तापकीर आणि राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष अश्विनीताई तापकीर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी लहान मुले आणि महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे महिलांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष संजय जराड यांच्यासह चंद्रकांत तापकीर, शशिकांत तापकीर, मनोज शिंदे, संतोष जराड, गणेश वाबळे, स्वप्निल नवथरे, राहुल तावरे, महेश तावरे, आकाश कवितके, अमृत यादव, प्रथमेश टावरे, ओम तापकीर, निखिल घाडगे, सागर वाघमारे, अक्षय जराड, आर्यन जराड, शुभम डोंगरे, सोहम जराड, सुशील सिंग, हितेश बर्गे, अजय साळुंखे यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.