ताथवडेत दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आरोपीला कठोर शिक्षेची एकमुखी मागणी

ताथवडे परिसरातील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या संतापजनक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी ताथवडे येथे भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पीडित मुलींना तातडीने न्याय मिळावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी एकमुखी मागणी केली.
मोर्चादरम्यान नागरिकांनी हातात फलक घेऊन आणि घोषणाबाजी करत या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. “पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे”, “महिलांच्या सुरक्षिततेशी तडजोड चालणार नाही”, “अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी उपस्थितांनी महिलांच्या व बालिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे सांगत अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली. समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा गुन्हेगारांना कोणतीही दया न दाखवता कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या जनआक्रोश मोर्चाची दखल घेत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेवक राहुल कलाटे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, नगरसेविका मनीषा पवार, श्रुती वाकडकर, स्नेहा कलाटे, शिवसेनेच्या ऋतु कांबळे तसेच नगरसेवक कुणाल वाव्हळकर, माजी नगरसेविका सुजाता पलांडे, वैशाली खाडे, सायली साळवे यांनी सहभाग घेतला. सर्व लोकप्रतिनिधींनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने जलदगतीने कारवाई करावी, अशी मागणी केली.
मोर्चाच्या शेवटी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. महिलांवरील आणि बालिकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याबरोबरच अशा गुन्ह्यांतील आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या घटनेमुळे ताथवडे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी एकजुटीने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
