पिंपरी चिंचवडबातम्या

बालंतविडा योजनेच्या २५ कोटींच्या निविदेवर प्रश्नचिन्ह! नगरसेवक संदीप वाघेरे यांची चौकशी करून प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बालंतविडा योजनेअंतर्गत स्तनदा माता व नवजात बालिकांसाठी साहित्य पुरवठा करण्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेतील विविध आर्थिक, तांत्रिक आणि प्रशासकीय विसंगतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या निविदेतील अटी-शर्तींमुळे स्थानिक महिला बचत गट, सूक्ष्म व लघुउद्योजकांना प्रत्यक्षात सहभागी होणे कठीण होण्याची शक्यता व्यक्त करत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत निविदा प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली आहे.

बालंतविडा योजना ही स्तनदा माता व नवजात बालिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची सामाजिक कल्याणकारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना दर्जेदार साहित्य मिळण्याबरोबरच महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेतील आर्थिक अटी, अनुभवाचे निकष, ISO प्रमाणपत्रांची सक्ती, अनामत रक्कम आणि इतर तांत्रिक तरतुदींमुळे स्थानिक महिला बचत गटांना समान संधी मिळणार का, असा प्रश्न वाघेरे यांनी उपस्थित केला आहे.

निविदेतील आर्थिक आकडेवारीत तफावत?

निविदा जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या १० कोटी ९४ लाख ३४ हजार रुपये आणि १३ कोटी ८५ लाख ६० हजार रुपये या रकमांमधील फरक स्पष्ट करण्यात आलेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच सुमारे २५ कोटी रुपयांच्या निविदेचा अंदाज कोणत्या आधारावर तयार करण्यात आला, संबंधित लेखाशीर्षाखाली पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध आहे का आणि वस्तुनिहाय बाजारभावांचा विचार करण्यात आला आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दोन वर्षे की तीन वर्षे? संचसंख्येबाबतही संभ्रम

निविदा जाहिरातीमध्ये दोन वर्षांचा कालावधी नमूद असताना निविदेतील एका अटीमध्ये तीन वर्षांचा उल्लेख असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. तसेच ३६ हजार माता संच आणि १७ हजार बालिका संच ही संख्या वार्षिक आहे की संपूर्ण निविदा कालावधीसाठी, याबाबत स्पष्टता नसल्याने निविदादारांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो, असे वाघेरे यांनी म्हटले आहे.

मोठ्या आर्थिक अटींमुळे महिला बचत गट स्पर्धेबाहेर?

निविदेमध्ये बयाणा रक्कम, अनामत रक्कम आणि निविदा शुल्क याबाबत वेगवेगळ्या तरतुदी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. अनामत रकमेसाठी ५ टक्के आणि ३ टक्के अशा वेगवेगळ्या अटी नमूद असल्याने नेमकी कोणती अट लागू आहे, याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुमारे २४.८० लाख रुपये बयाणा रक्कम आणि सुमारे १.२४ कोटी रुपये अनामत रक्कम यांसारख्या आर्थिक अटींमुळे स्थानिक महिला बचत गट आणि लघुउद्योजकांना निविदेत सहभागी होणे कठीण होऊ शकते. त्यामुळे पात्र सूक्ष्म व लघुउद्योगांना लागू असलेल्या शासकीय सवलतींची अंमलबजावणी झाली आहे का, हे तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.

अनुभव, ISO प्रमाणपत्रे आणि प्रयोगशाळा तपासणीवर आक्षेप

१५० लाख रुपयांच्या अनुभवाची अट कोणत्या कालावधीसाठी लागू आहे, तसेच तत्सम शासकीय साहित्य पुरवठ्याचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे का, याबाबत स्पष्टता मागण्यात आली आहे. तीन ISO प्रमाणपत्रे अनिवार्य करण्यामागील कारणेही स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय साहित्याच्या नमुन्यांची तपासणी कोणत्या प्रयोगशाळेत केली जाणार, संबंधित प्रयोगशाळेला NABL मान्यता आहे का, तपासणीचे निकष काय आहेत आणि ३० हजार रुपये तपासणी शुल्क आकारण्याचा आधार काय आहे, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

पुरवठा, वितरण आणि अन्नसुरक्षेची जबाबदारी कोणाची?

साहित्य वाय.सी.एम. भांडारात जमा करायचे की पुरवठादाराने थेट लाभार्थ्यांना वितरित करायचे, याबाबत निविदेतील तरतुदींमध्ये स्पष्टता नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच खाद्यपदार्थांची गुणवत्ता, साठवणूक, पॅकिंग, मुदत समाप्ती तारीख, वाहतूक आणि वितरणाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता, उत्पन्न मर्यादा, आवश्यक कागदपत्रे आणि नवजात बालकांच्या समावेशाबाबतही स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.

स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करून सुधारित निविदा काढण्याची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची निविदा तयार करणाऱ्या विभागापासून स्वतंत्र अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संदीप वाघेरे यांनी केली आहे. निविदेचे मूळ अंदाजपत्रक, वस्तुनिहाय दर, मागील तीन वर्षांची प्रसूती व लाभार्थी संख्या, प्रयोगशाळेचे दरपत्रक, गुणवत्ता तपासणी अहवाल, निविदा समितीचा अहवाल आणि सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मंजुरीच्या प्रती उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

निविदेतील सर्व अटींचे पुनरावलोकन करून आवश्यक सुधारणा अधिकृत शुद्धिपत्रकाद्वारे प्रसिद्ध कराव्यात. मूलभूत त्रुटी असल्यास निविदा नियमानुसार रद्द करून सुधारित अटींसह नव्याने निविदा प्रसिद्ध करावी आणि त्यासाठी किमान २१ दिवसांचा कालावधी द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

योजनेला विरोध नाही, पारदर्शक अंमलबजावणी हवी!

या योजनेला किंवा कोणत्याही विशिष्ट पुरवठादाराला आपला विरोध नसून गरजू माता व बालिकांना दर्जेदार साहित्य मिळावे, महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि महापालिकेच्या सार्वजनिक निधीचा योग्य विनियोग व्हावा, हीच आपली भूमिका असल्याचे संदीप वाघेरे यांनी स्पष्ट केले आहे.

महापालिका प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत निविदा प्रक्रियेला स्थगिती द्यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.