Wednesday, September 9, 2026
Latest:
पिंपरी चिंचवडबातम्या

पिंपरीत ‘स्वाइन फ्लू’चा उद्रेक; ३९ दिवसांत ५४ रुग्ण, डेंग्यूचाही डंख वाढला!

पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तीव्र वाढ झाली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात ‘स्वाइन फ्लू’च्या (एच१ एन१) रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात ३१ तर सप्टेंबरच्या आठ दिवसांत २३ सकारात्मक रुग्ण आढळून आले आहेत. ३९ दिवसांत ५४ रुग्ण आढळले असून, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार जानेवारीत एक, तर जुलैमध्ये ‘स्वाइन फ्लू’चे पाच रुग्ण आढळले होते. गेल्या काही वर्षांमध्ये ‘स्वाइन फ्लू’चा धोका कमी झाला होता. यंदा या विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी महिन्यात ‘स्वाइन फ्लू’चा एकच रुग्ण आढळला होता. त्यानंतर जुलै महिन्यात ‘स्वाइन फ्लू’चे पाच रुग्ण आढळले हाेते. ऑगस्टमध्ये माेठी वाढ हाेऊन रुग्णसंख्या ३१ झाली.

सप्टेंबरच्या आठ दिवसांत २३ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे सव्वा महिन्यात रुग्णसंख्या ५४ वर गेली आहे. ‘स्वाइन फ्लू’चा धोका हा गरोदर महिला, असाध्य आजार आणि लहान मुलांना जास्त आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी सातत्याने काम करणाऱ्या लोकांनाही ‘स्वाइन फ्लू’चा धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. वातावरणातील बदल, दूषित हवा, पाणी, प्रदूषण यामुळे साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

डेंग्यूच्या डंखात वाढ
डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात ३७, तर सप्टेंबरच्या आठ दिवसांत १५ असे मागील ३९ दिवसांत ५२ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. जूनमध्ये दोन आणि जुलैमध्ये १३ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. जानेवारीपासून आत्तापर्यंत मलेरियाचे २० रुग्ण आढळले आहेत.

ताप, घसा दुखणे, अंगदुखीची लक्षणे असल्यास तत्काळ महापालिकेच्या रुग्णालयात येऊन तपासणी करून घ्यावी. डेंग्यूच्या आळ्या स्वच्छ पाण्यात तयार हाेतात. त्यामुळे घरात किंवा परिसरात स्वच्छ पाण्याची डबकी तयार हाेऊ देऊ नयेत. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस काेरडा पाळावा. ‘स्वाइन फ्लू’ हा आजार संक्रमित व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला हाेताे. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आराेग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण गाेफणे यांनी केले आहे.