पुणेबातम्या

लहान वयातच बुद्धिमत्तेची मोठी भरारी; १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव !

 
गुणाकारापासून बुद्धिमत्तेच्या विस्तारापर्यंत; विद्यार्थ्यांनी गाजवली राष्ट्रीय स्पर्धा !

पुणे : गणित म्हटले की अनेक विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारी भीती दूर होऊन त्याच विषयाची गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला योग्य दिशा मिळावी आणि त्यांच्यात स्पर्धात्मक आत्मविश्वास विकसित व्हावा, या शैक्षणिक व सामाजिक उद्देशाने आयोजित नवव्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एससीएमएएस (SCMAS) संस्थेतर्फे कात्रज येथे आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसह सुमारे एक हजार पालकांनी उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढविला.

या कार्यक्रमाला एससीएमएएसच्या संस्थापिका सुजाता हलवाई, मराठी अभिनेते रोहित काकडे, जिल्हा परिषद शिक्षिका सीमा शिंदे आणि उद्योजिका सपना काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षणाचे महत्त्व, सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि जीवनात ध्येय निश्चित करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.हलवाई म्हणाल्या की अबॅकस, फोनिक्स आणि वैदिक मॅथ्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती, गणितीय कौशल्य आणि आकलनक्षमता विकसित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. केवळ गुण मिळविण्यापुरते शिक्षण मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी तर्कशक्ती विकसित करावी, गणित सहजपणे सोडवावे आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जावे, हा या आयोजनामागील सकारात्मक दृष्टिकोन आहे.

स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल १०० हून अधिक विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. के. के. मार्केट सेंटरच्या विद्यार्थ्यांनी ११ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. सोनाली पवार यांच्या विद्यार्थ्यांनी सात हजार रुपयांचे, तर वंडरलँड ई-लर्निंग इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळविले.