बातम्या

पिंपरी-चिंचचवडमधील आशा स्वयंसेविका-गट प्रवर्तकांना ‘‘दिवाळी गिफ्ट’’

– भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनंतर प्रशासनाची कार्यवाही
– पात्र आशा स्वयंसेविका गटप्रवर्तकांना ७ ते १५ हजार रुपये मिळणार!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना दिवाळीनिमित्त ७ हजार ते १५ हजार रुपयांचा प्रोत्साहनपर भत्ता देण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी याबाबत दि. २७ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र देऊन भत्ता मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी महापालिकेचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. त्यामुळे आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

माता-बाल आरोग्य, लसीकरण, विविध आजारांचे सर्वेक्षण आणि शासकीय आरोग्य योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यात आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः झोपडपट्ट्या आणि वंचित वस्त्यांमध्ये आरोग्य यंत्रणा व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून त्या काम करतात. त्यांच्या कामाची व्याप्ती आणि वाढती महागाई लक्षात घेऊन दिवाळी भत्त्याबाबत प्राधान्याने निर्णय घ्यावा, असे लांडगे यांनी पत्रात नमूद केले होते.

पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करणे, आवश्यक आर्थिक तरतूद व प्रशासकीय मान्यता घेणे आणि भत्त्याची रक्कम दिवाळीपूर्वी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणे, यासाठी वैद्यकीय व लेखा विभागांना निर्देश द्यावेत, अशी मागणीही लांडगे यांनी केली होती. मागील वर्षी मंजूर भत्त्यापैकी कोणाची रक्कम प्रलंबित असल्यास पडताळणी करून ती तातडीने अदा करावी, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली होती.

**
किमान भत्त्यात चार हजारांची वाढ
मागील वर्षी पात्र आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी ३ हजार ते १० हजार रुपयांचा प्रोत्साहनपर भत्ता मंजूर करण्यात आला होता. यंदा किमान भत्ता ४ हजार रुपयांनी, तर कमाल भत्ता ५ हजार रुपयांनी वाढविण्यात आला आहे. सप्टेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत किमान सहा महिने (१८० दिवस) काम केलेल्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना विहित अटींनुसार हा लाभ मिळणार आहे. महापालिकेच्या ठरावानुसार, २०२५-२६ मध्ये ७५१ आशा स्वयंसेविका कार्यरत होत्या. भत्त्याचा खर्च वैद्यकीय विभागाच्या कुटुंब कल्याणअंतर्गत ‘बोनस तथा सानुग्रह अनुदान’ या लेखाशिर्षातून करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
***
प्रतिक्रिया :

“लसीकरणापासून माता-बाल आरोग्यापर्यंत अनेक सेवा घरोघरी पोहोचवण्याचे काम आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक करतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन दिवाळीनिमित्त प्रोत्साहनपर भत्ता द्यावा, अशी मागणी मी महापालिका आयुक्तांकडे केली होती. पात्र स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना ७ ते १५ हजार रुपयांचा भत्ता देण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. मंजूर रक्कम त्यांच्या बँक खात्यात लवकर जमा व्हावी, यासाठी पाठपुरावा करणार आहे.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.