पर्यावरणपुरक विकासासाठी अहवाल दिशादर्शक!, आयुक्त शेखर सिंह

सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णी
पिंपरी (दि. २५ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात येणाऱे विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा व त्यांचे शहराच्या पर्यावरणावर होणारे परिणाम यांचे मुल्यांकन करणारा सन २०२२-२३ चा ‘पर्यावरण सद्यस्थिती अहवाल’ आयुक्त तथा प्रशासक शेखऱ सिंह यांच्याकडे आज झालेल्या विशेष बैठकीत सादर करण्यात आला.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या विशेष बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, संजय कुलकर्णी, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्यासह उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, क्षेत्रिय अधिकारी, कार्यकारी अभियंता तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा, मलनिस्सारण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्ते, घनकचरा, हरितक्षेत्र, उद्यान विकास संवर्धन अशा अनेक सुविधा महापालिकेमार्फत पुरविल्या जातात. या सर्व सुविधांचे व्यवस्थापन करताना त्याचा शहराच्या पर्यावरणावर आणि नागरिकांच्या राहणीमानावर परिणाम होत असतो. त्या दृष्टीने पर्यावरण सद्यस्थिती अहवाल महत्वपुर्ण आहे. शहराच्या शाश्वत तसेच पर्यावरणपुरक विकासासाठी हा अहवाल दिशादर्शक ठरेल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.
पर्यावरण सद्यस्थिती अहवालात महापालिकेचे विविध विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये यांच्याकडून प्राप्त झालेली पर्यावरणविषयक माहिती तसेच स्कायलॅब या संस्थेने महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी केलेल्या वायू, ध्वनी, पाणी इत्यादी चाचण्यांच्या निकषांवर पर्यावरण सद्यस्थिती अहवाल आधारित आहे, असे पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
शहरवाढीला चालना देणारे घटक, नैसर्गिक साधनसंपत्ती व नागरी सुविधांवर पडणारा ताण, शहराची पर्यावरण सद्यस्थिती, पर्यावरणीय परिस्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि कृती कार्यक्रम यांची माहिती या अहवालात आहे. या अहवालानुसार पिंपरी चिंचवड शहरातील एकूण लोकसंख्येपैकी ८९.२२ टक्के लोकसंख्या साक्षर असून त्यात पुरूष ९२.४१ टक्के तर स्त्रियांचे प्रमाण ८५.३७ टक्के आहे. सन २०२१-२२ मध्ये पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुळे श्वसन संस्थेच्या आजाराच्या रुग्णसंख्येत तसेच डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. तर महापालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील विद्यार्थी संख्येत वाढ दिसून येत आहे. कोविड काळात कमी झालेली वाहन नोंदनी पुन्हा पुर्ववत होत असून पेट्रोल, डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांची संख्या ६७ टक्के असून ई-वाहनांची संख्या ७ टक्के आहे. सन २०२२-२३ मध्ये ई-वाहन वापरण्यावर नागरिकांनी भर दिला आहे. वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येचा शहराच्या रस्तेवाहतुकीवर विपरित परिणाम होऊन वाहतूक कोडीं सारख्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात
आला आहे.
शहराचे सरासरी तापमान २५.५ अंश सेल्सिअस असून मे महिन्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच सरासरी ३६ अंश सेल्सिअस तर हिवाळ्यात ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत हवेतील धुलिकणांमध्ये वाढ झाली आहे. शांतता क्षेत्र तसेच रहिवासी क्षेत्रामध्ये ध्वनीपातळी ही निर्धारित पातळीपेक्षा जास्त आहे. शहराचा विस्तार व वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याच्या मागणीमध्ये वाढ होऊ शकते असे या अहवालात नमुद
करण्यात आले आहे. तर वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा, रोजगार, व्यापार, शिक्षण, आरोग्य, क्रिडा, सांस्कृतिक तसेच मनोरंजन, क्षेत्रातील पायाभूत सुविधांमुळे पिंपरी चिंचवड शहराचे आकर्षण वाढले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय सेवांची आकडेवारी देण्यात आली असून महापालिकेच्या विविध रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये दररोज ४ हजार ३५७ बाह्यरुग्ण उपचारासाठी येतात तर वर्षभरात ५३ हजार १४४ व्यक्ती आंतररुग्ण म्हणून दाखल झाले आहेत. शहरातील सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, धुलीकण, अतिसुक्ष्म धुलीकणांची पातळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मानांकणानुसार विहीत मर्यादेमध्ये असल्याचा निष्कर्ष अहवालात नमूद करण्यात आला आहे. मेट्रोमुळे शहरातील वाहतूक सुविधा सुलभ होणार असून वायु, ध्वनी, रस्त्यावरील ताण आणि वाहतूक कोंडी यावर सकारात्मक परिणाम होणार आहे.
गणेशोत्सव, दिवाळी उत्सव तसेच उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यातील ध्वनी पातळीची आकडेवारी अहवालात नमूद करण्यात आली आहे. सण-उत्सवाच्या काळात विशिष्ट ठिकाणी ध्वनी पातळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निर्धारित मानांकनापेक्षा वाढली असल्याचे अहवालात दर्शविण्यात आले आहे.
शहरातील नद्यांच्या पाण्याची रासायनिक तपासणीची आकडेवारी या अहवालात नमूद करण्यात आली आहे. नदीमध्ये जाणारे सांडपाणी, निर्माल्य, कपडे, धुणे अशा विविध गोष्टींमुळे पाण्याची गुणवत्ता ढासळते. मुळा नदी ही पवना व इंद्रायणी नदीच्या तुलनेत कमी प्रदुषित दिसून येते. पवना नदी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत असल्याने अधिकांश नाले या नदीत मिसळतात तर इंद्रायणी नदी औद्योगिक क्षेत्रातून वाहत असल्याने या नद्या प्रदुषित होत असल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदविण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रामध्ये वाढ करण्यास प्रयत्नशील असल्याचे या अहवालात दिसून आले आहे. शहरातील विविध आजारांमुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या या अहवालात नमुद करण्यात आली आहे. महापालिकेने पर्यावरणपुरक राबविलेले उपक्रम, शासनाकडून मिळालेली निधी, विविध पारितोषिके याचा उहापोह अहवालात करण्यात आला आहे.