भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय – स्वामी गोविंद देव गिरी
विश्व श्रीराम सेना आयोजित छटपूजा महोत्सवात मोशी येथे भक्तीचा जनसागर

पिंपरी, पुणे (दि. १५ नोव्हेंबर २०२६) भारतीय परंपरेत सूर्य नारायणाच्या उपासनेला अत्यंत महत्त्व आहे. माता, भगिनींनी ही आपली भारतीय संस्कृती जपली आहे. माता, भगिनी उपासनेसाठी उत्सुक असतात आणि त्यांची देवावर अढळ श्रद्धा असते. या मातांच्या सद्गुणांमुळेच यशस्वी पती, पत्नी घडतात. भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय आहेत. देवी सीता आणि सावित्री या आमच्या आदर्श आहेत. जे सद्गुण पाळणाऱ्यांचे दर्शन घेतात, त्यांना पुण्य मिळते. छटपूजेच्या निमित्ताने आज विश्व श्रीराम सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात इंद्रायणी नदीच्या काठावर मला एका भव्य दिव्य दृश्याचे दर्शन झाले. पूजा आणि श्रद्धेचा असा सागर पाहून माझे हृदय भरून आले असल्याचे अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे विश्वस्त स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले.
रविवारी, (दि. १५) विश्व श्री राम सेनेच्या वतीने मोशी, इंद्रायणी नदीच्या घाटावर भव्य छटपूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या हस्ते भव्य गंगा आरती करण्यात आली. यावेळी विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. लालबाबू गुप्ता यांनी स्वागत केले. स्वामी भरतानंद महाराज, आचार्य देशपांडे, नगरसेवक यश साने, कुंदन गायकवाड आणि निखिल बोराटे यांच्यासह सुमारे १५ हजार उत्तर भारतीय बंधू भगिनी उपस्थित होते. पवित्र तीर्थस्थान काशी येथून आलेल्या पुरोहितांनी भव्य गंगा आरती ने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. सर्वांनी घाटावर छठ मातेची पूजा आणि प्रार्थना केली. डॉ. लालबाबू गुप्ता यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांसाठी मुख्यमंत्री मदत निधी करिता स्वामी गोविंददेव गिरी महाराजांकडे एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश यावेळी सुपूर्द केला. छठ मातेच्या भक्तीगीतांनी आणि मातांच्या छठ गीतांनी इंद्रायणी नदीचा काठ भक्तीच्या सागरात न्हाऊन निघाला.
स्वामी गोविंददेव गिरी महाराज पुढे म्हणाले की, ज्ञानेश्वर माऊली या पवित्र इंद्रायणी तीरावर आळंदी मध्ये समाधीस्थ आहेत. माऊली म्हणजे आई. आपण सर्व भारत मातेचे पुत्र आहोत. देशातील सर्व आपल्या माता कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी छठ मातेची पूजा करतात. या माता, भगिनींना मी वंदन करतो. आपण भारतमातेची सेवा आणि देशाची प्रगती अशीच चालू ठेवूया. छठ माता तुमच्या इच्छा पूर्ण करो असे शुभ आशीर्वाद स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिले.
