पिंपरी चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान ‘सरदार वल्लभभाई पटेल प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन…
एकता दौड यांसह विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवानी; रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर आणि रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय पर्वात विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत भक्ती शक्ती शिल्प, निगडी येथे एकता दौड आणि देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता ‘वर्तमान भारतासाठी सरदार पटेल यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान होणार असून, त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ‘अपरिचित सरदार गाथा’ हा संगीतमय कार्यक्रम निगडी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर येथे होणार आहे.
रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी ३ ते ५ या वेळेत सरदार पटेल यांच्या जीवनचरित्रावर आधारित कार्यक्रम होणार आहे. रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे. यामध्ये सरदार पटेल यांच्या जीवनकार्यावर आधारित नाट्यप्रयोग, ‘अखंड भारताचे शिलेदार, तुकडे ते राष्ट्र’ हा सायंकाळी ६ वाजता होईल. याशिवाय निबंध, रांगोळी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनपटावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले आहे
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रएकात्मता, राष्ट्रीय एकता आणि अखंड भारताच्या निर्मितीतील योगदानाचे स्मरण करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा प्रसार समाजात व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. तरी नागरिकांनी या दोन दिवसीय ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’मध्ये सहभागी होऊन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील यांनी केले आहे.
