पिंपरी चिंचवडबातम्या

पिंपळे सौदागरमध्ये २.५ एमएलडी क्षमतेचा जलकुंभ उभारण्याची नाना काटे यांची मागणी

प्रभाग क्र. २८ मधील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर १५ ते २० गुंठे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड : पिंपळे सौदागर परिसरातील वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज लक्षात घेऊन २.५ एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा जलकुंभ उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षण क्र. ४/११२ (खेळाचे मैदान – PG) या आरक्षित जागेतून सुमारे १५ ते २० गुंठे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

पिंपळे सौदागर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. परिसरात मोठ्या निवासी इमारती आणि गृहप्रकल्पांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लोकसंख्येतही मोठी भर पडत आहे. परिणामी, पाणीपुरवठ्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, भविष्यात नागरिकांना पुरेशा प्रमाणात आणि सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रस्तावित जागेवर २.५ एमएलडी क्षमतेचा जलकुंभ उभारल्यास परिसरातील वाढत्या पाण्याच्या मागणीचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. तसेच भविष्यातील लोकसंख्या वाढीचा विचार करून पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

संबंधित जागेची पाहणी करून नियमानुसार आवश्यक मंजुरी, तांत्रिक प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करावी. तसेच जलकुंभ उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागाला आवश्यक आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

पिंपळे सौदागरमधील नागरिकांना भविष्यात पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून पुढील कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.