लेखनातून अवर्णनीय आनंद लाभतो! – अनिल शिंदे
दिलासा लेखक सन्मान सोहळा संपन्न

पिंपरी (दिनांक : २१ ऑक्टोबर २०२६) ‘साहित्यविश्व अद्भुत असून लेखनातून अवर्णनीय आनंद लाभतो!’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अनिल शिंदे यांनी खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे व्यक्त केले. गतवर्षीच्या विजयादशमीपासून दिलासा साहित्य सेवा संघाच्या व्हॉट्सॲप समूहावर वर्षभर साप्ताहिक सदरलेखन करणाऱ्या लेखकांचा सन्मान करताना अनिल शिंदे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक तानाजी एकोंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सुलभा सत्तुरवार, कवयित्री फुलवती जगताप यांची व्यासपीठावर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, राज अहेरराव, राधाबाई वाघमारे, शोभा जोशी, बाळकृष्ण अमृतकर, कल्पना बंब, मल्लिकार्जुन इंगळे, प्रकाश रणदिवे आदी मान्यवरांची सभागृहात प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी अशोकमहाराज गोरे (‘वेदावतार तुकोबा’), अर्जुन चौधरी (‘आठवणींच्या वाटेवर’), नारायण कुंभार (‘गण गण गणात बोते’), सुहास सतर्के (‘जय जय श्री गुरुदेवदत्त’), सुरेश कंक (‘चला चला जाऊ सिनेमाला’), कांचन नेवे (‘प्रभात दरवळ’), अंबादास रोडे (‘विद्यार्थी घडविताना…’)
या साप्ताहिक सदरलेखन करणाऱ्या लेखकांना सन्मानित करण्यात आले. सुलभा सत्तुरवार यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या; तर तानाजी एकोंडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, लेखकांनी आशयघन आणि शुद्धलेखनाचे निकष पाळून लेखन करताना वाचकांच्या सूचना, टीका – टिप्पणीचाही आदर करावा, असे आवाहन केले. लेखकांच्या वतीने नारायण कुंभार, अर्जुन चौधरी, सुरेश कंक यांनी कृतज्ञतापूर्वक मनोगते व्यक्त केलीत.
ग्रंथपूजन आणि सुभाष चव्हाण यांच्या शंखवादनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शामराव सरकाळे, सुहास घुमरे, स्मिता सतर्के, श्रीकृष्ण नेवे, अजय नेवे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शामला पंडित यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
