Saturday, October 17, 2026
Latest:
पिंपरी चिंचवडबातम्या

​पिंपरी महापालिकेशेजारील बेकायदेशीर वृक्षतोडप्रकरणी दोषी बिल्डर व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा! आप युवा आघाडीच्या वतीने २२ ऑक्टोबरला ‘वृक्ष अंत्ययात्रा’ करणार.- रविराज काळे*

पिंपरी (प्रतिनिधी):

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयाशेजारील बांधकाम प्रकल्पासाठी ५२ पेक्षा जास्त जुन्या वृक्षांचे वय आणि संख्या कागदपत्रांमध्ये कमी दाखवून बेकायदेशीरपणे झाडांची तोड करण्यात आली आहे. बिल्डरला तब्बल 1.5 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक फायदा पोहोचवण्यासाठी उद्यान अधीक्षक महेश गारगोटे व राजेश वसावे या अधिकाऱ्यांनी वृक्ष प्राधिकरणाचा मूळ अहवालच बदलून वृक्ष प्राधिकरण समिती अध्यक्ष व जनतेची उघड फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.  

​या घोटाळ्याचा व पर्यावरण घाताचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड (AAP) आणि महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या वतीने गुरुवार, दिनांक 22 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 03:00 वाजता ‘वृक्ष अंत्ययात्रा’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 आंदोलनाचा तपशील:

​दिनांक: गुरुवार, 22/10/2026

​वेळ: दुपारी 03:00 वाजता

​प्रारंभ ठिकाण: ज्या ठिकाणावरून बेकायदेशीर वृक्षतोड झाली, त्या जागेपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आऊटगेटपर्यंत.

​आम आदमी पार्टी युवक आघाडीच्या प्रमुख मागण्या:

1). बेकायदेशीर वृक्षतोड त्वरित थांबवून दोषी बिल्डर (सुखवानी असोसिएट्स) आणि अहवाल बदलणारे उद्यान अधीक्षक महेश गारगोटे व राजेश वसावे या अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करण्यात यावेत.

2). दिशाभूल करून घेतलेली बांधकामाची परवानगी रद्द करण्यात यावी.

3) . नियमानुसार १,०१८ झाडे लावण्यासाठी प्रति वृक्ष 15 हजार रुपयांप्रमाणे ₹1.52 कोटींचा दंड वसूल करण्यात यावा.

4) स्पेशल केस करून अहवाल बदलणाऱ्या महेश गारगोटे व राजेश वसावे यांना तातडीने निलंबित करा .

5. या संपूर्ण प्रकरणाची विभागीय व सखोल चौकशी करण्यात यावी.  

     ​एवढा मोठा गैरव्यवहार अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही अद्याप कसलीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनातील वरपासून खालपर्यंत सर्वांचेच हात यात ओले झाले आहेत की काय, असा संशय निर्माण होत आहे.  

​”वृक्ष तोड थांबवा… निसर्ग वाचवा!” या हाकेसह शहरातील सर्व पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेने या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.