पिंपरी चिंचवडबातम्या

मातीशी नाळ जोडलेला  ‘नटसम्राट’ हरपला; नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे  – आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

पिंपरी चिंचवड,  8 ऑक्टोबर 2026 : ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला जगण्याची नवी दिशा देणारे समाजसेवक आणि आपल्या अद्वितीय अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. नानांचे जाणे हे केवळ कला आणि सामाजिक क्षेत्राचे नुकसान नसून, माझ्यासाठी ते एका ज्येष्ठ मार्गदर्शकाचे छत्र हरपल्यासारखे दुःख आहे, अशा अत्यंत भावूक शब्दांत विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

मातीशी घट्ट नाळ असलेले अत्यंत हळवे व्यक्तिमत्व
नाना पाटेकर यांच्यासोबतचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आणि त्यांच्या कार्याचा गौरव करताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी उभारलेली पाणी चळवळ आणि जलयुक्त शिवाराची निर्मिती हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे. केवळ शब्दांची सहानुभूती न दाखवता, नानांनी ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीवर मायेचा हात ठेवून त्यांना जगण्याची उमेद दिली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी स्वतः मैदानात उतरून जे कार्य उभे केले, ते पिढ्यानपिढ्या स्मरणात राहील. नाना पाटेकर हे पडद्यावरचे एक करारी आणि निडर अभिनेता, पण खऱ्या आयुष्यात मात्र मातीची वेदना जाणणारे, मातीशी घट्ट नाळ असलेले अत्यंत हळवे व्यक्तिमत्व होते.

माझ्यासाठी कायम दीपस्तंभासारखे
माझे आणि नानांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे राहिले. जेव्हा जेव्हा सामाजिक प्रश्न, लोककल्याणकारी योजना किंवा विधायक कामांविषयी चर्चा व्हायची, तेव्हा नानांचे मार्गदर्शन मला नेहमीच नवी ऊर्जा द्यायचे. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, समाजकार्यातील निस्वार्थी तळमळ आणि माणसांवरील अथांग प्रेम हे माझ्यासाठी कायम दीपस्तंभासारखे राहिले आहे. आज नाना आपल्यात नाहीत यावर मन अजूनही विश्वास ठेवायला तयार नाही. सिद्धीच्या शिखरावर असूनही त्यांची पावलं कायम शेतात आणि मातीकडेच वळत राहिली.आज नानांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे, अशा शब्दांत आमदार अमित गोरखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नानांनी कलाक्षेत्रात आपल्या अभिनयाचा जो दरारा निर्माण केला, तितकाच मोठा ठसा त्यांनी सामाजिक क्रांतीत उमटवला. त्यांनी दाखवलेला सेवेचा मार्ग आणि दुष्काळमुक्तीचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि या अथांग दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना,’नाम फाउंडेशन’च्या सहकाऱ्यांना व तमाम महाराष्ट्राला लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,’ असे आमदार अमित गोरखे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.