Monday, October 5, 2026
Latest:
पुणेबातम्या

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. सौ. स्मिता योगेश जाधव यांचा नामांकन अर्ज दाखल

स्मिताताईंच्या रूपाने शिक्षण, माध्यम आणि सामाजिक क्षेत्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि उच्चशिक्षीत चेहरा महायुतीला लाभला – आमदार अमित गोरखे

पुणे, 05 ऑक्टोबर 2026 : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजप-महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ. स्मिता योगेश जाधव यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आपला नामांकन अर्ज दाखल केला.  यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आ. अमित गोरखे, आमदार श्री. महेशदादा लांडगे आणि आमदार सौ. उमाताई खापरे यांच्यासह  भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, यांच्यासह भाजपा-महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुसंस्कृत, अभ्यासू आणि उच्चशिक्षीत चेहरा
यावेळी बोलताना आमदार श्री. अमित गोरखे म्हणाले की, डॉ. सौ. स्मिताताई जाधव यांच्या रूपाने शिक्षण, माध्यम आणि सामाजिक क्षेत्राचा त्रिवेणी संगम असलेला एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि उच्चशिक्षीत चेहरा महायुतीला लाभला आहे. डी. वाय. पाटील परिवाराचा शैक्षणिक आणि सामाजिक वारसा यामुळे पदवीधर मतदारसंघातील बेरोजगारी, कौशल्यविकास, उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या नवीन संधी यांसारखे प्रलंबित प्रश्न अत्यंत प्रभावीपणे सोडवण्यास त्या पूर्णपणे सक्षम आहेत. महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

समृद्ध वारसा आणि शैक्षणिक अनुभव
डॉ. सौ. स्मिता योगेश जाधव या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी-चिंचवडचे संस्थापक डॉ. पी. डी. पाटील यांच्या कन्या आणि ‘दैनिक पुढारी’चे संचालक श्री. योगेश जाधव यांच्या पत्नी आहेत. त्या सध्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू तथा सचिव म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहेत. शिक्षण, माध्यम आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचा दीर्घ व समृद्ध अनुभव पदवीधरांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे.

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेमध्ये शिक्षण, युवा शक्ती आणि ज्ञानाधिष्ठित विकासाला सर्वोच्च स्थान आहे. या राष्ट्रीय प्रवाहात महाराष्ट्राचे योगदान अधिक बळकट करणे आणि राज्याच्या प्रगतीमध्ये शिक्षण व युवा वर्गाची भूमिका अधिक प्रभावी करणे, हाच आपला मुख्य उद्देश असल्याचे डॉ. स्मिता जाधव यांनी नमूद केले.