कॉस्टारिका सोसायटीचा सीएसआरमधून ‘झिरो वेस्ट प्रकल्प‘; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते उद्घाटन
ओला कचरा प्रक्रियेसह टप्प्याटप्प्याने सुका, पुनर्वापरयोग्य व ई-कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा उपक्रम

वाकड | प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देत वाकड येथील कोस्टा रिका को-ऑपरेटिव्ह सोसायटीने ‘झिरो वेस्ट इनिशिएटिव्ह’ या स्तुत्य उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
सोसायटीतील कचरा व्यवस्थापन अधिक शास्त्रीय, शाश्वत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी Mothers Company च्या CSR अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या SORT Program च्या माध्यमातून सहकार्य मिळणार आहे.
या उपक्रमाच्या प्रारंभिक टप्प्यात ओला कचरा प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक एरो बिन्स, स्टँड, कोकोपीट तसेच इतर आवश्यक साहित्य व उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच सोसायटीमध्ये कचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुढील तीन महिने कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, प्रक्रिया, देखभाल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आउटपुटचे व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे नियमित मॉनिटरिंगही करण्यात येणार आहे.
सोसायटीने या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अकरा सदस्यांची स्वतंत्र ‘झिरो वेस्ट कमिटी’ स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून सोसायटीतील नागरिकांमध्ये जनजागृती करणे, घराघरांत जाऊन कचरा वर्गीकरणाबाबत माहिती देणे, माहितीपत्रके व फ्लायर्सच्या माध्यमातून जनजागृती करणे तसेच कचरा व्यवस्थापनाच्या विविध टप्प्यांचे निरीक्षण करणे अशी कामे केली जाणार आहेत.
सध्या ओला कचरा आणि सुका कचरा यांचे योग्य वर्गीकरण करण्यावर भर देण्यात येत असून, पुढील टप्प्यात बायो-वेस्ट, प्लास्टिक व इतर पुनर्वापरयोग्य कचरा तसेच इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे स्वतंत्र व्यवस्थापन करण्याचा मानस आहे. यासाठी संबंधित पुनर्वापर संस्थांशी समन्वय साधून सोसायटीच्या पातळीवरच जास्तीत जास्त कचऱ्यावर प्रक्रिया अथवा पुनर्वापर करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी बोलताना नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले, “कचरा व्यवस्थापन ही महापालिकेसह प्रत्येक नागरिक आणि गृहनिर्माण सोसायटीचीही तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. कोस्टा रिका सोसायटीने सुरू केलेला हा उपक्रम इतर सोसायट्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो. कचरा निर्माण होण्याच्या ठिकाणीच त्याचे योग्य वर्गीकरण आणि प्रक्रिया झाली, तर महापालिकेवरील कचरा व्यवस्थापनाचा ताण निश्चितच कमी होण्यास मदत होईल.”
ते पुढे म्हणाले, “ओल्या कचऱ्यापासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने सुका कचरा, प्लास्टिक, पुनर्वापरयोग्य साहित्य आणि ई-कचऱ्याचे व्यवस्थापन सोसायटीच्या पातळीवर करण्याचा हा प्रयत्न आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग, योग्य प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मॉनिटरिंग यांच्या माध्यमातून ‘झिरो वेस्ट’च्या दिशेने वाटचाल करणे शक्य आहे.”
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू झालेला हा उपक्रम पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणारा असून, शहरातील इतर सोसायटीतील नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
यावेळी रोहित सावंत, प्रवीण छेत्री, गौरव सूर्यवंशी, दिगंबर बोडके, प्रसाद आने, सोनाली तेंबे, गिरीश शिंदे, सुदीप कार गुप्ता, राजू शर्मा, समीर पावट, निलेश घिनमिने यांच्यासह सोसायटीतील नागरिक उपस्थित होते.
