पिंपरी चिंचवडबातम्या

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ – मंत्री ॲड. आशिष शेलार

देशव्यापी ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

बीएसईमध्ये ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ उपक्रम; ऑक्टोबर महिन्यात सायबर सुरक्षेबाबत जागृती

मुंबई, दि. २ : शहरे, लहान गावे आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा ऑनलाइन वावर वाढत असताना त्यांना सायबर गुन्ह्यांच्या नवनवीन प्रकारांचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे डिजिटल जनजागृती आणि डिजिटल स्वच्छता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची असून, भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती हीच प्रभावी ‘फायरवॉल’ ठरू शकते, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (डीएससीआय) सायबर सुरक्षा जनजागृती महिना २०२६ अंतर्गत देशव्यापी ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये (बीएसई) झाला. महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेत नागरिकांना दैनंदिन सायबर सुरक्षेच्या सवयींबाबत मार्गदर्शन करण्यासह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने होणारी फसवणूक आणि वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक करण्यात येणार आहे.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, निवृत्तीवेतनधारक, गुंतवणूकदार, ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी, डिजिटल उपकरणे वापरणाऱ्या माता तसेच ई-स्पोर्ट्स खेळाडू अशा प्रत्येक घटकाने ऑनलाइन सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत सोपे आणि व्यवहार्य सुरक्षाविषयक संदेश पोहोचविणारी ही बहुघटक मोहीम कुटुंबे, व्यवसाय आणि समुदायांच्या सायबर सुरक्षेला बळकटी देईल. ‘कठपुतळी’ ही संकल्पना सायबर संरक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडते. ही मोहीम देशातील सर्वांत व्यापक सायबर जनजागृती मोहिमांपैकी एक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सायबर क्षेत्रातील सामूहिक प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासन उद्योग क्षेत्रासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे. सायबर सुरक्षा ही केवळ तांत्रिक बाब नसून नागरिकांचा सजग सहभागही तितकाच आवश्यक आहे, असे मंत्री ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले.

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह 

सायबर सुरक्षेबाबत माहिती देताना माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नागरिकांना लक्ष्य करणारे सायबर धोके वेगाने बदलत आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी केवळ तांत्रिक संरक्षण पुरेसे नसून प्रत्येक व्यक्तीने सतर्क राहणे आवश्यक आहे. ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’सारख्या मोहिमांमधून डिजिटल धोक्यांचे स्वरूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जात असून नागरिकांना व्यवहार्य सुरक्षाविषयक सवयी अंगीकारण्यासाठी सक्षम केले जात आहे.

सुरक्षित डिजिटल परिसंस्थेसाठी सर्व संबंधित घटकांमध्ये भक्कम समन्वय आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने माहितीपूर्ण, सावध आणि सायबरदृष्ट्या सजग राहिल्यास अधिक सुरक्षित व सक्षम डिजिटल भारताच्या उभारणीत योगदान देता येईल, असे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.

ऑक्टोबर हा महिना जगभरात सायबर सुरक्षा जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. मोहिमेच्या शुभारंभानिमित्त बीएसईच्या पारंपरिक घंटानादाच्या धर्तीवर ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ हा प्रतीकात्मक उपक्रम राबविण्यात आला. सुरक्षित सायबर अवकाशासाठी शासन आणि उद्योग क्षेत्राची सामूहिक बांधिलकी यातून व्यक्त करण्यात आली. यावेळी मोहिमेच्या ‘सायबर अँथम’चेही अनावरण करण्यात आले.

या मोहिमेला इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In), केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर (I4C), केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, महाराष्ट्र शासन तसेच बीएसईसह विविध उद्योग भागीदारांचे सहकार्य लाभले आहे.

भारतीय पारंपरिक कठपुतळी कथाकथन कलेचा डिजिटल युगासाठी वापर करून सायबर सुरक्षेचे संदेश सहज समजतील, लक्षात राहतील आणि नागरिकांना इतरांपर्यंत पोहोचविता येतील, अशी मोहिमेची रचना आहे. या माध्यमातून मोबाइल ॲप, ई-मेल, समाजमाध्यमे आणि डिजिटल व्यवहारांमधील सुरक्षित सवयींबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. एपीकेद्वारे होणारी फसवणूक, एआय व्हॉइस क्लोनिंग, रिअल टाइम डीपफेक, ‘डिजिटल अटक’, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फसवणूक आणि अन्य उदयोन्मुख धोक्यांची माहितीही दिली जाणार आहे.

स्क्रीनसेव्हर्स मंच, पोस्टर चौपाल, माहितीचित्रे, सायबर कथा, स्टिकर्स आणि ‘सायबर पाठशाला की किताब’ अशा सहज प्रसारित करता येणाऱ्या माध्यमांतून जनजागृती साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे साहित्य https://www.dsci.in/cyber-security-awareness-month-2026/ या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

डीएससीआयचे संचालक सुकृत घोष यांनी प्रास्ताविकाद्वारे कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. याप्रसंगी महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव, बीएसई, सेबी, इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर यांच्यासह या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या १७ औद्योगिक भागीदार संस्थांतील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

०००००