पिंपरीत विसर्जन मिरवणुकीला खड्ड्यांचे विघ्न; शहरात २५२ खड्डे बुजविणे बाकी!
चार महिन्यांत शहरात ३ हजार ६० खड्डे; २ हजार ८०९ खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा

पिंपरी : गणेशोत्सवापूर्वी पिंपरी-चिंचवड शहर खड्डेमुक्त करण्याचा महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरल्याचे चित्र आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, शुक्रवारी (दि. २५ सप्टेंबर) होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसमोरही खड्ड्यांचे विघ्न उभे राहिले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये आणखी भर पडली आहे. दरम्यान, शहरातील ३ हजार ६० खड्ड्यांपैकी २ हजार ८०९ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात डांबरी, काँक्रीट तसेच कच्च्या स्वरूपाचे सुमारे २ हजार ७३ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. या रस्त्यांची रुंदी १२ फुटांपासून ८० फुटांपर्यंत आहे. जून महिन्यापासून शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर ३ हजार ६० खड्डे आढळून आले आहेत. त्यापैकी ९१.८० टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे.
महामार्गावरील रस्त्यांची चाळण
मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरी ते चिंचवड स्टेशनदरम्यानच्या रस्त्याची तसेच निगडीतील सेवा रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. बीआरटी मार्गावरही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून बाहेर पडलेली खडी रस्त्यावर पसरल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
खड्डे चुकविण्यासाठी वाहनचालकांना अचानक दिशा बदलावी लागत आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडीत भर पडत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
चार महिन्यांत तीन हजार खड्डे
महापालिकेच्या माहितीनुसार, जून महिन्यापासून शहरातील रस्त्यांवर आढळलेल्या ३ हजार ६० खड्ड्यांपैकी विविध पद्धतींचा वापर करून २ हजार ८०९ खड्डे बुजविण्यात आले आहेत. यामध्ये डांबर आणि कोल्ड मिक्सने ९९२, बीबीएमने ५४, खडीने १ हजार २८९, पेव्हिंग ब्लॉकने २४५, तर काँक्रीटने २२९ खड्डे बुजविण्यात आले आहेत.
महापालिका प्रशासनाच्या दाव्यानुसार, एकूण खड्ड्यांपैकी ९१.८० टक्के खड्डे बुजविण्यात आले असून, उर्वरित २५२ खड्डे बुजविण्याचे काम बाकी आहे. मात्र, पावसामुळे पुन्हा खड्डे पडत असल्याने दुरुस्तीच्या कामासमोर आव्हान निर्माण झाले आहे.
महामार्गावरील विलगकामांमुळे वाहतूक कोंडी
पुणे-मुंबई महामार्गावरील समतल विलगकामांमध्ये आगमन आणि निर्गमन मार्गांत सातत्याने बदल केला जात आहे. चिंचवड स्टेशन तसेच निगडीतील पवळे उड्डाणपुलाच्या अलीकडील आगमन-निर्गमन मार्गांमध्ये बदल करण्यात आल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.
निगडीतील समतल विलगकामातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग नसतानाही काही रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. खड्डे, रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतुकीतील बदल यांमुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पावसामुळे पुन्हा खड्डे; ठेकेदाराला नोटीस
शहरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. मुंबई-पुणे महामार्गावरील सेवा रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यामुळे संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी दिली.
एकीकडे गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू असताना दुसरीकडे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे विसर्जनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाकडून उर्वरित खड्डे तातडीने बुजविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
