भोसरी पट्ट्यातील स्मशानभूमींमध्येही ‘मरणयातना’, शैलजा मोरेंची खंत

चौथ्या दिवशीही दुरवस्थेचा आढावा; डुडुळगाव, दिघी, भोसरी आणि पिंपळे गुरव स्मशानभूमींची पाहणी
पिंपरी, : शहरातील स्मशानभूमींमधील समस्या जाणून घेण्यासाठी सुरू असलेल्या पाहणी मोहिमेच्या चौथ्या दिवशी माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी डुडुळगाव, दिघी गावठाण, भोसरी गावठाण आणि पिंपळे गुरव येथील स्मशानभूमींना भेट दिली. यावेळी विविध ठिकाणी पाणी, स्वच्छता, सुरक्षा, कर्मचाऱ्यांच्या सुविधा आणि मूलभूत सोयींचा अभाव असल्याचे निदर्शनास आले.
डुडुळगाव स्मशानभूमीत कर्मचाऱ्यांना मेडिकिट व पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याचे आढळले. जाळ्या तुटलेल्या असून पाण्याचे नळही खराब आहेत. स्वच्छतागृह पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर त्याची दुरुस्ती झालेली नाही. कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन, संरक्षण भिंत आणि चिमणीचीही सुविधा नसल्याचे पाहणीत समोर आले. तसेच, वापरलेले पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याचे निदर्शनास आले.
दिघी गावठाणातील स्मशानभूमीत कर्मचाऱ्यांना मेडिकिट व विमा संरक्षण नसल्याचे, परिसरात राडारोडा व गवत वाढल्याचे आढळले. जळण विधीच्या ठिकाणी कोबा खराब असून विटांचीही दुरवस्था झाली आहे. शौचालयांमध्ये नळ व पाण्याच्या टाक्या नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
भोसरी गावठाण स्मशानभूमीत कचरा नियमित उचलला जात नसल्याने अस्वच्छता दिसून आली. प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नसून कर्मचाऱ्यांना मेडिकिट व पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याचे आढळले. स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली आहे. यावेळी नगरसेविका राणी पठारे उपस्थित होत्या.
पिंपळे गुरव स्मशानभूमीत कर्मचाऱ्यांना मेडिकिट व विमा संरक्षण नसल्याचे, सफाई कामगार वेळेत काम करत नसल्याचे निदर्शनास आले. चिमण्या नसून जाळ्यांमध्ये कचरा साचला आहे. नदीपात्रात पाणी सोडले जात असून कर्मचारी व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पुराच्या पाण्यामुळे संरक्षण भिंतीचे नुकसान झाले आहे. या पाहणीवेळी माजी महापौर शकुंतला धराडे, नगरसेवक शाम जगताप आणि नगरसेविका रविना आंघोळकर उपस्थित होते.
