पिंपरी चिंचवडबातम्या

पिंपरी-चिंचवडमध्ये २९ सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ’; ५ वी पास ते उच्चशिक्षित तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी.!

आ. मा. सौ. उमाताई खापरे, श्री.अनुप मोरे,  श्री.तुषार हिंगे,  श्री.जयदीप खापरे यांच्या माध्यमातून आणि ‘युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या सहकार्याने महामेळाव्याचे आयोजन; मा.श्री.रविंद्र दादा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

– रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह ‘महामेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड:पिंपरी-चिंचवड शहरातील बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी शहरात भव्य पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी ‘रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात आले आहे. आ. मा.सौ. उमाताई खापरे यांच्या विशेष पुढाकाराने आणि अनुप मोरे, तुषार हिंगे, जयदीप खापरे यांच्या माध्यमातून आणि ‘युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या सहकार्याने या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा महामेळावा होत आहे.

मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मा. श्री. मंगलप्रभातजी लोढा यांच्या मार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. चिंचवड येथील ‘ऑटो क्लस्टर’ येथे सकाळी ९:०० ते दुपारी ३:०० या वेळेत हा महामेळावा पार पडणार आहे. मा.श्री.रविंद्र दादा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.

विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचा असणार सहभाग
या महाकुंभामध्ये बँकिंग, आयटी, आयटीआय, बीपीओ, केपीओ, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल आणि टेक्नॉलॉजी यांसारख्या विविध अग्रगण्य क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये Axis Bank, ICICI Bank, Tata Motors, Hudas Technology, Wiggle Space, Bajaj आणि Hyundai यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे.

पाचवी पास ते उच्चशिक्षित उमेदवारांना संधी
या रोजगार मेळाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ उच्चशिक्षितच नव्हे तर ५ वी पास उमेदवारांपासून ते १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच इतर सर्व पात्र उमेदवारांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकरीच्या हक्काच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

उमेदवारांसाठी विशेष ‘जॉब कार्ड’ उपक्रम
मेळाव्यात सहभागी झालेल्या परंतु तात्काळ नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी आयोजकांच्या वतीने एक नाविन्यपूर्ण ‘जॉब कार्ड’ उपक्रम राबविला जाणार आहे. या कार्डद्वारे प्रत्येक उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि रोजगाराची गरज याची माहिती संकलित केली जाईल, जेणेकरून भविष्यात उपलब्ध होणाऱ्या योग्य रोजगाराच्या संधींसोबत या तरुणांना जोडता येईल.

आयोजकांचे आवाहन
“प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कुटुंबाला रोजगार व स्वयंरोजगाराची संधी” मिळावी, हा या महाकुंभाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह व अपडेटेड बायोडाटासह (Resume) मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक श्री. अनुप मोरे (अध्यक्ष, अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन), श्री. तुषार हिंगे (अध्यक्ष, आरंभ सोशल फाऊंडेशन) आणि श्री. जयदीप खापरे (अध्यक्ष, टीम पिंपरी-चिंचवड) यांनी केले आहे.