पुणे बनणार देशातील सर्वांत वेगवान वाहतुकीचे शहर! मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘प्लॅन’
पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा प्लॅन जाहीर केला आहे.

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. यावरून स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारवर सातत्याने टीका होत आहे. पुण्यातील ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पुढील तीन ते चार वर्षांत पुण्याची ओळख देशातील सर्वांत वेगवान वाहतूक असलेले शहर अशी बनेल, असा जाहीर शब्द मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांना दिला आहे.
पुण्याला देशातील सर्वाधिक वेगवान वाहतुकीचे शहर बनवण्याचे नियोजन करण्यात आले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पुण्यातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यात बाह्य वर्तुळाकार मार्ग, अंतर्गत वर्तुळाकार मार्ग, भुयारी मार्ग, उच्च क्षमता द्रुतगती मार्ग यांचा समावेश आहे. यातील काही कामे सूर असून उरलेल्या कामांना गती देण्यात येत आहे. या जोडीला शहरात मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारत आहे. तसेच पीएमपीही सक्षम करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार वर्षात पुण्यातील वाहतूक देशात सर्वाधिक वेगवान बनलेली असेल.
‘बजाज फिनसर्व्ह’च्या मुख्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महापौर मंजूषा नागपुरे, ‘बजाज फिनसर्व्ह’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, बजाज फिनसर्व्ह सीएसआरच्या अध्यक्ष शेफाली बजाज, बजाज फायनान्सचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव जैन, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह बजाज समूहातील पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, पुण्यात उभारण्यात येणारे बजाज फिनसर्व्हचे मुख्यालय आणि त्यातील सुविधा देशातील महत्त्वाची आणि शाश्वत व्यवस्था ठरणार आहे. या व्यवस्थेत सुमारे ४० हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. मुंढवा परिसराला जोडणारा रस्ता आणि अतिरिक्त पुलाची उभारणी मुख्यालयाचे काम पूर्ण होण्यापूर्वी उभारण्यात येईल. बजाज समूहाने पुण्यात कला आणि सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा मनोदय व्यक्त केला असून, महानगरपालिकेसह सर्वांच्या सहकार्याने असे केंद्र उभारण्यात येईल.
मुंबई, पुणे आघाडीवर
‘मुंबई आणि पुणे देशातील वित्त तंत्रज्ञान परिसंस्थेत आघाडीवर आहेत. यंदा पहिल्या तिमाहीत मुंबईने बंगळुरूला मागे टाकले असून, एकूण वित्त तंत्रज्ञान गुंतवणुकीपैकी ६१ टक्के गुंतवणूक मुंबईत झाली आहे. वित्त तंत्रज्ञान नवउद्यमींमध्येही मोठी वाढ झाली असून, ती ५९ टक्के आहे. राज्यात ९० कोटी डॉलरची गुंतवणूक या क्षेत्रात झाली आहे. ही वित्त तंत्रज्ञान परिसंस्था नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथेही नेण्याची गरज आहे. लवकरच नागपूरमध्येही बजाज फिनसर्व्हची सेवा सुरू झालेली दिसेल,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
महाराष्ट्राचे वर्चस्व
महाराष्ट्र वित्त तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी बनला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार आणि बँकिंग क्षेत्रात राज्य पुढे असून, आणखी पुढे नेण्यासाठी विशेष धोरण तयार केले आहे. विमा आणि डिजिटल कर्ज वितरण क्षेत्रात महाराष्ट्राने आपले वर्चस्व कायम ठेवावे, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
