पुण्यात महिलांचे ‘बहुमत’…१४३ वर्षांपासून आजपर्यंतच्या महिला मतदारांचा धांडोळा
पुण्यात १४३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक झाली आहे.

नगरपालिका असताना १८८३ मध्ये पहिली निवडणूक झाली, तेव्हा पुण्याची मतदारांची संख्या होती अवघी ४९१८. नगरपालिकेची १९५० मध्ये महापालिका झाली आणि १९५२ च्या पहिल्या निवडणुकीत मतदारांचा आकडा पोहोचला दोन लाख चार हजार दोनशेवर. आता ७५ वर्षांत मतदारांची संख्या १९ लाख ८२ हजार ९९२ वर पोहोचली. या आकडेवारीवर नजर टाकल्यास पुण्यातील मतदारांचा हा आलेख कसा उंचावत गेला, याचा अंदाज येतो. मात्र, २०२६ पूर्वीपर्यंत स्थिती अशी होती, की पुण्यात पुरुष मतदार हे जास्त होते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीनुसार पहिल्यांदाच महिला मतदारांची संंख्या जास्त झाल्याने पुण्यात आता ‘महिलाराज’ आले आहे. त्यामुळे पुण्याचे लोकप्रतिनिधी म्हणून कोणाला निवडायचे, हे ‘लाडक्या बहिणी’ बहुमताने ठरविणार आहेत.
मतदारांबाबतीत पुण्याचे वेगळेपण म्हणजे पुण्यात १८८२ मध्येच महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. मात्र, १९२४ पर्यंत त्यांना उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे राहता येत नव्हते. तत्कालीन सरकारने कायदा बदलून महिलांना उमेदवार म्हणून निवडणुकीस उभे राहण्याची परवानगी दिली आणि पुण्यात महिलांना राजकीय क्षेत्रात पाऊल टाकण्याचा मार्ग मोकळा झाला. पण १९३८ पर्यंत एकही महिला पुणे नगरपालिकेच्या सभागृहात सभासद म्हणून निवडून आली नव्हती. त्यामुळे १९३८ मध्ये महिलांसाठी दोन जागा राखीव ठेवण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आणि नगरपालिकेमध्ये महिलांना प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. १९५० मध्ये महिलांच्या राखीव जागा रद्द करून त्यांना सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली. त्याचा परिणाम असा झाला, की पुणे महापालिकेच्या १९५२ च्या पहिल्या निवडणुकीत ६५ पैकी फक्त एका जागेवर महिला निवडून येऊ शकली. १९५७ च्या महापालिका निवडणुकीत तीन महिला निवडून आल्या. सध्या पुणे महापालिकेत १६५ पैकी ८८ नगरसेविका आहेत. आता परिस्थिती बदलली आहे. भविष्यात कोणाला निवडून द्यायचे, हे महिला मतदार ठरविणार आहेत. पुण्यात झालेल्या या बदलामुळे पुण्याचा कारभार हा ‘लाडक्या बहिणीं’च्या हाती असणार आहे.
राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना लागू झाल्याचा फायदा महायुतीला झाला. महायुती पुन्हा सत्तेवर आली. आता पुण्यात पहिल्यांदाच पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त झाली असून, दहा लाख ३०८ महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
‘एसआयआर’ मोहिमेनंतर प्रारूप मतदारयादी जाहीर झाली. त्यानुसार जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये ६२ लाख १३ हजार ६९२ मतदार आहेत. त्यामध्ये ‘भोसरी’त सर्वाधिक ४ लाख ६१ हजार ९३४, तर ‘शिवाजीनगर’मध्ये सर्वांत कमी एक लाख ६३ हजार २६१ मतदार आहेत.
पुणे शहरात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंंघांत पुरुष मतदार ९ लाख ८२ हजार ६८४, तर १० लाख ३०८ महिला मतदारांची नावे आहेत. त्यामुळे पुरुषांपेक्षा १७ हजार ६२४ महिला मतदार जास्त आहेत. या महिलांचे मत कोणाच्या बाजूने कलणार, यावर उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे.
पुण्यातील आठपैकी सहा विधानसभा मतदारसंघांत महिलाराज असणार आहे. कारण त्या ठिकाणी महिला मतदारांची संख्या जास्त झाली आहे. त्यामध्ये वडगाव शेरी मतदारसंघात पुरुष मतदार १,५७,३९२ असून, महिला मतदार १,५७,५२० आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार ७९,२४२, तर महिला मतदार ८४,००२ आहेत. ‘कोथरूड’मध्ये पुरुष १,१८,४४४ आणि महिला १,२२,७४६ मतदार आहेत. ‘खडकवासला’मध्ये पुरुष १,५९,९३९ असून, महिला मतदार १,५९,३०९ आहेत. ‘पर्वती’त पुरुष १,०८,२८९ आणि महिला १,११,२४५ मतदार आहेत. ‘हडपसर’मध्ये पुरुष मतदार १,७८,३७७ आणि महिला मतदार १,७४,६९० आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात पुरुष ८७,४६७ आणि महिला ९२,१२७ मतदार, तर ‘कसबा पेठ’मध्ये पुरुष मतदार ९३,५३४ असून, महिला ९८,६६९ आहेत.
पुरुष आणि महिला मतदारांच्या या तुलनात्मक आकडेवारीनुसार, वडगाव शेरीत १२८ महिला मतदार जास्त आहेत. याव्यतिरिक्त शिवाजीनगरमध्ये ४,७६०, कोथरूडमध्ये ४,३०२, पर्वतीमध्ये २,९५६, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ४,६६० आणि कसबा पेठमध्ये ५,१३५ महिला मतदार या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहेत. खडकवासला आणि हडपसर या दोन मतदारसंघांमध्ये मात्र पुरुष मतदारांची संख्या जास्त आहे. खडकवासलामध्ये ६३० पुरुष मतदार जास्त आहेत, तर हडपसरमध्ये ३,६८७ पुरुष मतदारांची संख्या जास्त आहे.
‘एसआरए’ मोहीम राबविण्यापूर्वी पुण्यातील आठ मतदारसंघांमध्ये स्थिती निराळी होती. त्या वेळी पुरुष मतदार १७,७८,४५३ आणि महिला १६,८६,३६५ होत्या. त्यानुसार ९२,०८८ पुरुष मतदार जास्त होते. त्यामध्ये फक्त कसबा पेठ या एकाच मतदारसंघात महिलांची संख्या ही पुरुष मतदारांपेक्षा जास्त होती. तेव्हा या मतदारसंघात पुरुष मतदार १,४०,०११, तर महिला मतदार १,४४,६२२ होत्या. म्हणजेच महिला मतदार ४,६११ जास्त होत्या.
कोणत्याही क्षेत्रात नवा मार्ग दाखविणाऱ्या पुण्याने मतदारनोंदणीतही वेगळा ठसा उमटविला आहे. आता ‘लाडक्या बहिणी’ काय करू शकतात, हे पाहण्यासाठी २०२९ च्या निवडणुकीची पुणेकरांना वाट पाहावी लागणार आहे.
