पिंपरी चिंचवडबातम्या

पिंपरीच्या नगरसेवकांसाठी आता ‘धन्वंतरी गाेल्ड’! काय आहे नेमकी योजना?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी राबवण्यात येणारी ‘धन्वंतरी गोल्ड’ आरोग्य योजना आता नगरसेवकांसाठीही लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय उपचारांकरिता कार्यान्वित असलेली ‘धन्वंतरी गाेल्ड’ याेजना आता नगरसेवकांकरिताही लागू करण्यात येणार आहे. या योजनेचा ‘स्वीकृत’सह १३८ नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांना लाभ होणार आहे.

महापालिकेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेली धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करून २०२४ मध्ये आरोग्य विमा योजना सुरू करण्यात आली हाेती. त्या योजनेबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या हाेत्या. त्यामुळे सन २०२५ मध्ये ‘धन्वंतरी गाेल्ड’ याेजना लागू करण्यात आली आहे. या याेजनेचा कार्यरत आणि निवृत्त असे १० हजार ४९३ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य लाभ घेत आहेत. महापौर रवी लांडगे यांनी वैद्यकीय विभागाला नगरसेवकांसाठीही ही याेजना लागू करण्याची सूचना केली होती. त्यानुसार विद्यमान नगरसेवक, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वैद्यकीय उपचारासाठी धन्वंतरी गाेल्ड याेजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याेजनेंर्तगत पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील ५० रुग्णालये व सिंगल स्पेशालिटीच्या १० रुग्णालयांबराेबर करार करण्यात आला आहे. या रुग्णालयांत नगरसेवक, त्यांच्या कुटुंबीयांना संवर्ग एकनुसार उपचार मिळणार आहेत. नगरसेवकांना प्रति महिना दीड हजार रुपये स्वहिस्सा द्यावा लागणार आहे. हा हिस्सा मानधनातून कपात होईल. उपचारांसाठी एका कुटुंबासाठी वर्षाकरिता २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २० लाखांपुढे खर्च झाल्यास वाढीव खर्चासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेली १५ जणांची समिती निर्णय घेणार आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी किती आहे स्वहिस्सा
‘अ’ आणि ‘ब’ संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रति महिना दीड हजार रूपये, ‘क’ संवर्गातील कर्मचाऱ्यांना एक हजार शंभर रूपये तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ७०० रूपयांचा स्वहिस्सा द्यावा लागत आहे. यामधून १२ काेटी १७ लाख ३१ हजार ६०० रुपये जमा हाेणार आहेत. उर्वरित रक्कम महापालिकेच्या फंडातून जमा केली जाणार आहे.

‘आयव्हीएफ’साठी एक लाखांची मदत
महापालिकेतील ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपत्य हाेत नाही, त्यांच्यासाठी पहिल्या अपत्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी किंवा इन व्रिटाे गर्भधारणा (आयव्हीएफ) उपचार पद्धतीसाठी एक लाख रूपयांची मदत केली जात आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला मद्यप्राशणामुळे आजाराची लागण झाली असल्यास, डाॅक्टरांनी मद्यप्राशनाचे कारण दिल्यास कर्मचाऱ्याला धन्वंतरी गाेल्ड याेजनेचा लाभ दिला जाणार नाही.