भर पावसाळ्यात गुरुवारी पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ भागात पाणी नाही; शुक्रवारीही कमी दाबाने पुरवठा
गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित; शुक्रवारी सकाळी कमी दाबाने होणार पुरवठा

पिंपरी : चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युतविषयक कामांमुळे गुरुवारी (३ सप्टेंबर) भोसरी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारचा (४ सप्टेंबर) सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातील पाणी रावेत बंधाऱ्यावरुन उचलून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. आंद्रा धरणातील पाणी निघोजे बंधाऱ्यावरुन उचलून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथून जलकुंभाद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जातो.
चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात २०० दशलक्ष लीटर क्षमतेच्या नवीन प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पाकरिता उच्चदाब वीज पुरवठा करण्यासाठी गुरुवारी उच्चदाब केबल वीजप्रणाली जोडण्यात येणार आहे. त्यासाठी वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे. बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर, सेक्टर ४, ६, ९, ११ व १२, शीवरस्ता, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, चोवीसावाडी व इतर परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा
पवना धरण – ५५० दशलक्ष लीटर
आंद्रा धरण – ८० दशलक्ष लीटर
एमआयडीसी – २० दशलक्ष लीटर
एकूण – ६५० दशलक्ष लीटर
साडे सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा
सर्वांना मुबलक व पुरेसे पाणी मिळण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर २०१९ मध्ये काही दिवसांसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. काही दिवसांसाठीचा एक दिवसाआडचा पाणीपुरवठा पुढे कायम ठेवण्यात आला आहे. साडे सहा वर्षे पूर्ण झाली, तरी एक दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. वाढीव पाणी मिळत नाही, तोपर्यंत दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे प्रशासन सांगत आहे.
१५ टक्के पाणीकपात कायम
शहरात १९ जूनपासून सुरू असलेली १५ टक्के पाणी कपात अद्यापही कायम आहे. पवना धरणात १०० टक्के पाणीसाठा असतानाही पाणी कपात रद्द करण्यात आली नाही.
शहराची लोकसंख्या ३८ लाख, दिवसाला ६५० एमएलडी पाण्याची आवश्यकता
पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येला शुद्ध, सुरक्षित आणि अखंड पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने पवना धरण ते सेक्टर २३, निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पवना धरणातील पाणी प्रदूषणमुक्त व विश्वासार्ह पद्धतीने थेट जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३८ लाख असून दररोज सुमारे ६५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये पवना नदीतून ५२० एमएलडी, इंद्रायणी नदीतून १०० एमएलडी आणि एमआयडीसीमार्फत ३० एमएलडी पाणी उपलब्ध होते. सध्याची पाण्याची मागणी ६५५ एमएलडी असून मंजूर पाणी आरक्षण ७७६ एमएलडी आहे. लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता हे आरक्षण २०२९ पर्यंत पुरेसे राहील, असा अंदाज आहे.
