निगडीतील भुयारी मार्गाच्या स्वच्छता, सुरक्षेचा उपमहापौर बाबर यांनी घेतला आढावा
नियमित स्वच्छता, रात्री कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक तैनातीसह मद्यपींवर कारवाईच्या सूचना

पिंपरी, दि. १९ ऑगस्ट २०२६ : निगडी येथील मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या भुयारी मार्ग परिसरातील स्वच्छता, सुरक्षा आणि अतिक्रमणाच्या प्रश्नांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पाहणी दौरा करून आढावा घेतला. परिसरातील स्वच्छता नियमितपणे राखण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

भुयारी मार्ग परिसरात नियमितपणे साफसफाई करण्यात यावी. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशी सूचना उपमहापौर बाबर यांनी केली. परिसरात मद्यपान करणाऱ्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, अशा व्यक्तींवर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित व्यापारी आणि नागरिकांशी उपमहापौर बाबर यांनी संवाद साधून परिसरातील विविध समस्या जाणून घेतल्या. व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्या आणि नागरिकांच्या तक्रारींची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
भुयारी मार्ग परिसरातील अतिक्रमणाच्या समस्येकडेही संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी. परिसर स्वच्छ आणि सुरक्षित राहण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी सहायक आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड, सुरक्षा निरीक्षक गौरव मोरे, निगडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास शिवणेकर, राजू चौधरी, शरद रणपिसे, रफीक गोलंदाज, सागर सावंत, बाबुराव इंगळे, बाबुराव चौधरी आदी उपस्थित होते.
