पिंपरी चिंचवडबातम्या

दिशा उपक्रमांतर्गत स्ट्रीट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन; बी बी एम एफ सी संघाचा विजेतेपदावर कब्जा

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विशेष बाल पथक विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘दिशा’ उपक्रमाच्या माध्यमातून तसेच संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि पिंपरी-चिंचवड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने स्ट्रीट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल, पिंपरी येथे करण्यात आले. या स्पर्धेत बी बी एम एफ सी संघाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात १-० गोल करत विजेतेपद पटकावले. रायसींग स्टार पिंपरी संघ उपविजेता ठरला. यूनिवर्सल यूनाइटेड निगडी संघाला फेयर प्ले तर माईटी स्टोर्मस संघाला बेस्ट टीम चे पारितोषिक देण्यात आले. 

पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी व वंचित वस्त्यांमधील मुलांना एकत्र आणून त्यांना खेळाची संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव देणे आणि त्यांना सकारात्मक दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.

संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि ‘दिशा’ उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या परिसरातील मुलांना एकत्र आणून त्यांचे समुपदेशन केले जाते. तसेच प्रशिक्षित क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. खेळाच्या माध्यमातून मुलांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे (IPS) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या पॉल फलेरो यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी उपस्थित विद्यार्थी खेळाडूंना मार्गदर्शन केले. खेळाडूंनी नियमित व्यायाम करावा, योग्य आहार घ्यावा, चांगल्या सवयी अंगीकाराव्यात आणि खेळाकडे सातत्याने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अशा स्पर्धांमध्ये अधिकाधिक मुलांनी सहभागी होऊन आपल्या जीवनाला योग्य दिशा द्यावी. या माध्यमातून राज्यासाठी आणि देशासाठी उत्कृष्ट खेळाडू घडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी संदेश बोर्डे यांनी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून घडलेल्या यशोगाथांची माहिती दिली. क्रिडा विकास संस्था नागपूर ह्यांचे ह्या वर्षी झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धेचे 25 वर्ष पूर्ण झाले हे नमूद केले. योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि संधी मिळाल्यास वंचित घटकांतील मुलेही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवू शकतात, हे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाला मा.पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चोबे सो पिंपरी चिंचवड 

मा. अपर पोलीस आयुक्त श्री. बसवराज  तेली सो प्रादेशिक विभाग 

पोलीस उपायुक्त गुन्हे श्री रोहिदास पवार सो 

पोलीस उपायुक्त परिमंडळ 01

 श्री संदीप आटोळे सो 

सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉ. सुदर्शन राठोड 

सहाय्यक पोलीस आयुक्त सांगवी विभाग मनीषा कदम मॅडम 

व विशेष बाल पोलीस पथकातील अमलदार, दिशा उपक्रम अंतर्गत 24 पोलीस स्टेशन कडील एकूण  24 अधिकारी 29 अंमलदार तसेच 245 बालके  तसेच क्रीडा प्रशिक्षक नाझीर सय्यद. सुमित जगधने, स्वप्निल गायकवाड, जाबिर पाशा, शमशाद सिद्दीकी, पूनम देवकाते, अलका रखते, डिम्पल चौधरी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. संदेश बोर्डे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर समुपदेशक गौरव चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

खेळातून परिवर्तन, संधीमधून प्रगती आणि योग्य मार्गदर्शनातून उज्ज्वल भविष्य हा संदेश देणारी ही स्पर्धा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरली. ‘दिशा’ उपक्रम आणि संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित मुलांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.