पथनाट्यातून स्वच्छतेचा जागर…
ताथवडेतील विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश…

पिंपरी दि .२३ ऑक्टोबर २०२६: स्वच्छ शहराच्या निर्मितीसाठी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळेत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांसह नागरिकांना कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळेत पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी प्रभावी संदेश दिला. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करणे, रस्त्यावर कचरा न टाकणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या विषयांवर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. स्वच्छ शहर घडविण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांसोबतच नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच स्वच्छतेच्या सवयी रुजविणे आणि त्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या नियमांचे पालन केल्यास परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होते, याची जाणीवही विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
या उपक्रमाला ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने आणि आरोग्य निरीक्षक कोमल फर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.
स्वच्छता ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, आपल्या कचऱ्याचे ओला , सुका सॅनिटरी, विशेष काळजी योग्य कचरा अशा चार प्रकारे योग्य वर्गीकरण करून तो महापालिकेच्या घंटागाडीला देणे आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणे या सवयी प्रत्येकाने अंगीकाराव्यात, असे आवाहन या जनजागृती उपक्रमातून यावेळी करण्यात आले.
स्वच्छ आणि सुंदर शहराची निर्मिती करण्यासाठी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजविल्यास त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबावर आणि समाजावरही होतो. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि प्लास्टिकचा वापर टाळणे यांसारख्या सवयी प्रत्येकाने अंगीकाराव्यात. स्वच्छ शहर घडविण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा.
-डॉ. विजय सूर्यवंशी
आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका
स्वच्छतेच्या सवयी लहान वयातच रुजल्यास त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण समाजावर होतो. विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचवावा. ओला व सुका कचरा वेगळा करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या बाबींचे प्रत्येकाने दैनंदिन जीवनात पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहराची निर्मिती शक्य आहे.
-डॉ. प्रदीप ठेंगल
उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
