पिंपरी चिंचवड महापालिकेची पिंपळे गुरव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पिंपरी, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पिंपळे गुरव, प्रभाग क्रमांक २९ येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. प्रभात नगर येथील सुमारे ४३२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या आर.सी.सी. अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली.
महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत महानगरपालिका धडक कारवाई पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमध्ये बीट निरीक्षक विकास वारभुवन, सचिन फडतरे, रूपक शिनगारे आणि शिवानी भगत यांच्यासह ५ मजूर, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १५ जवान आणि ३ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
कारवाईसाठी १ जॉ क्रशर, २ जेसीबी आणि १ ट्रॅक्टर ब्रेकर या यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. आवश्यक पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेत ही कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत नियमांचे उल्लंघन करून करण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी महापालिकेच्या आवश्यक परवानग्या घेऊनच बांधकाम करावे. तसेच नियमांचे पालन करून शहराच्या नियोजनबद्ध विकासात सहकार्य करावे.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
