Wednesday, October 7, 2026
Latest:
पुणेबातम्या

पुणे मनपा–आनंदवन फाउंडेशनच्या संयुक्त वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ; ६,५०० नवीन वृक्षांची लागवड, ५०० वृक्षांचे पुनर्रोपण

पुणे,  : कोथरूडमधील प्रस्तावित ग. अ. कुलकर्णी पथ ते कर्वे पुतळा डीपी रोड प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आणि आनंदवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण व पुनर्रोपण उपक्रमाला आज प्रारंभ झाला. येवलेवाडी येथील सर्व्हे क्रमांक १८ मधील सात हेक्टर जागेवर ६,५०० नवीन वृक्षांची लागवड आणि ५०० विद्यमान वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.

पुणे महानगरपालिकेचे पुरुषोत्तम भूतडा आणि आनंदवन फाउंडेशनचे संस्थापक सचिव भूपेश शर्मा यांच्या हस्ते रोपे लावून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पुरुषोत्तम भूताडा म्हणाले, “प्रस्तावित कर्वे पुतळा रस्ता जोडणीचा उद्देश कोथरूडमधील अंतर्गत दळणवळण सुधारण्याबरोबरच सध्याच्या रस्त्यांवरील आणि चौकांवरील वाहतुकीचा ताण कमी करणे हा आहे. वाढती लोकसंख्या, पुनर्विकास आणि वाहतुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेता अतिरिक्त मार्गाची आवश्यकता आहे. या रस्त्यामुळे स्थानिक वाहतुकीचे अधिक प्रभावी विभाजन होऊन परिसरातील शेवटच्या टप्प्यातील दळणवळणही सुधारण्यास मदत होईल.”
“पायाभूत सुविधांचा विकास करताना पर्यावरणीय जबाबदारीही तितक्याच गांभीर्याने पार पाडणे आवश्यक आहे. वृक्षारोपण व पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंदवन फाउंडेशनचे आभार. लागवडीनंतर या वृक्षांची योग्य देखभाल व संवर्धन करणेही महत्त्वाचे असून, पुणे महानगरपालिका त्यांच्या दीर्घकालीन देखभालीची जबाबदारी पार पाडेल,” असेही भूताडा यांनी स्पष्ट केले.
आनंदवन फाउंडेशनचे संस्थापक सचिव भूपेश शर्मा म्हणाले, “वृक्षारोपण आणि पुनर्रोपणासाठी आमच्या देखरेखीखालील जागा पुणे महानगरपालिकेला उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. या उपक्रमामुळे पुण्याच्या हरित क्षेत्रात निश्चितच अर्थपूर्ण भर पडेल. वृक्षांची योग्य आणि दीर्घकालीन देखभाल झाल्यास हा उपक्रम पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत ठरेल.”
आनंदवन फाउंडेशनने येवलेवाडी येथील सर्व्हे क्रमांक १८ मधील सात हेक्टर जागा वृक्षारोपण व पुनर्रोपणासाठी पुणे महानगरपालिकेला उपलब्ध करून दिली आहे. या जागेवर लागवड झाल्यानंतर वृक्षांची देखभाल आणि संवर्धनाची जबाबदारी पुणे महानगरपालिकेकडे राहणार आहे. यासंदर्भातील संमतीपत्राची प्रत उपवनसंरक्षक, पुणे यांनाही देण्यात आली आहे.
प्रस्तावित ग. अ. कुलकर्णी पथ ते कर्वे पुतळा डीपी रोड प्रकल्पासाठी काही वृक्ष बाधित होणार आहेत. त्यापैकी पुनर्रोपणासाठी योग्य असलेल्या वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण केले जाणार आहे. त्याचबरोबर सात हेक्टर जागेवर मोठ्या प्रमाणावर नवीन वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याने रस्ते विकासासोबत पर्यावरणीय समतोल राखण्याच्या उपाययोजनांनाही चालना मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांत कोथरूड परिसरात मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास झाल्याने लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताणही वाढला आहे. पूर्वी तुलनेने कमी वाहतुकीच्या काळात विकसित झालेले अंतर्गत रस्त्यांचे जाळे सध्याच्या वाढत्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत आहे.प्रस्तावित डीपी रोडमुळे कोथरूडला अंतर्गत पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून, स्थानिक वाहतुकीचे विभाजन होण्यास मदत होईल. परिणामी प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यास आणि परिसरातील दळणवळण अधिक सुलभ करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

हा रस्ता पुण्यात विस्तारत असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही पूरक ठरणार आहे. नळ स्टॉप ते वारजे आणि माणिकबागपर्यंत प्रस्तावित पुणे मेट्रोच्या नवीन ४अ विस्तारामुळे भविष्यात या परिसरातील सार्वजनिक वाहतुकीला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे.विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधत कोथरूडच्या वाहतूक व्यवस्थेला पर्यायी मार्ग देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.