Wednesday, October 7, 2026
Latest:
पिंपरी चिंचवडबातम्या

पिंपरी-चिंचवड शहरातील बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि बिल्डरवर तात्काळ गुन्हा दाखल करा: आम आदमी पार्टीची मागणी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयाच्या अगदी शेजारी सुरू असलेल्या ‘सुखवाणी असोसिएट्स बिल्डर्स आणि प्रमोटर्स’ या खाजगी प्रकल्पाच्या बांधकामात अडथळा ठरत असल्याचे सांगून तब्बल ५२ जुन्या झाडांची अत्यंत निर्दयपणे कत्तल करण्यात आली आहे. या प्रकरणी जबाबदार असलेले वृक्ष संवर्धन विभागाचे अधिकारी महेश गारगोटे आणि राजेश वसावे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.  

​या बेकायदेशीर कत्तलीविरोधात आम आदमी पार्टीचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.  

​निवेदनातील मुख्य मुद्दे व मागण्या:

​1) झाडांची संख्या आणि वय कमी दाखवून सुखवाणी बिल्डर आणि पालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागातील अधिकारी महेश गारगोटे व राजेश वसावे यांनी अहवालात फेरफार केला आहे. अनागोंदी कारभार करून वृक्षतोडीस प्रोत्साहन दिले असून मनपाचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे.  

​2)वृक्षतोडीस मान्यता देताना सदर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वृक्ष प्राधिकरणाची देखील दिशाभूल केली आहे. संबंधित बांधकामाला परवानगी दिली असल्यास ती तातडीने थांबवण्यात यावी.  

3) सुखवाणी बांधकाम व्यावसायिकाकडून १०१८ झाडे लावण्याचे (प्रति वृक्ष १५,००० रुपयांप्रमाणे) एकूण १,५२,७०,००० रुपये (एक कोटी बावन्न लाख सत्तर हजार रुपये) भरून घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.  

4) मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार, पुरेशी जाहीर नोटीस न देता किंवा निष्काळजीपणे वृक्षतोडीची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर बेकायदेशीर वृक्षतोडीसाठी फौजदारी खटला चालवला जाऊ शकतो. तसेच बिल्डरधार्जिणी भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून भारतीय न्याय संहिता (BNS) व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.  

​मनपा आयुक्तांनी या प्रकरणाचे पर्यावरणीय गांभीर्य विचारात घेऊन तात्काळ कडक कारवाई करावी. वृक्षतोडीस पाठबळ देणाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रविराज काळे यांनी दिला आहे.