अयोध्येतील राम मंदिराचं डिझाइन कोणी तयार केलं माहिती आहे?

SAKHI NEWS LIVE:-

अयोध्येतील रामजन्मभूमी येथे ५ ऑगस्टला राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अनेक दिग्गज व्यक्तिमत्व हजर राहणार आहेत. १ जुलैला रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची एक बैठक झाली. त्यात मंदिराच्या मॉडेलमध्ये थोडा बदल झाल्याची चर्चा होती. त्या बैठकीत सोमपुरा कुटुंबाशी संबंधित चंद्रकांत सोमपुरा हेच मंदिराची रचना तयार करतील, असा निर्णयही घेण्यात आला. १९८७ साली राम मंदिराचा नकाशादेखील वास्तूविशारद चंद्रकांत सोमपुरा यांनीच तयार केला होता. संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या राम मंदिराचं डिझाइन तयार करणारे चंद्रकांत सोमपुरा आहेत तरी कोण, ते जाणून घेऊया.

भारतातील बहुसंख्य लोकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या राम मंदिराचं डिझाइन तयार करणं सोपं नाही. मुळात या मंदिरांच्या दोन शैली येथे बांधल्या गेल्या आहेत. एक म्हणजे द्रविड शैली, ज्याची मंदिरे दक्षिण भारतात बांधली आहेत. दुसरी म्हणजे नागर शैली. या शैलीची मंदिरं उत्तर भारतात आढळतात. गुजरातचे सोमपुरा कुटुंब हे नागर शैलीतील मंदिरांचे शिल्पकार मानले जातात. हे संपूर्ण कुटुंब नागर शैलीची मंदिरे बनविण्यात पारंगत आहे. चंद्रकांत सोमपुरा यांचे वडील प्रभाशंकर सोमपुरा यांनी गुजरातमधील ऐतिहासिक सोमनाथ मंदिराची रचना केली. त्यांनी मथुराच्या मंदिराचीदेखील संरचना केली होती.

चंद्रकांत सोमपुरा

नागर शैलीची मंदिरे बांधण्याची कला प्रभाकर सोमपुरा यांनी आपल्या कुटुंबीयांना शिकवली. त्यामुळे नागर शैलीतील मंदिरात रचनेत त्यांच्या कुटुंबातील जवळजवळ सारेच निष्णात आहेत. सोमपुरा कुटुंबातील सदस्य केवळ देशातच नाही तर परदेशातही विविध ठिकाणी हिंदू मंदिरांच्या रचना करत आहेत.

चंद्रकांत सोमपुरा यांनी देश आणि जगातील नागरी शैलीतील मंदिरांची रचना केलेली आहे. लंडनमधील प्रसिद्ध अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिराची रचना त्यांनी केली होती. या मंदिराचे स्थापत्य आणि भव्यता कायमच चर्चेचा विषय असतो. अहमदाबाद येथील चंद्रकांत सोमपुरा यांनी त्यांच्या ४७ व्या वर्षी म्हणजे १९९० मध्ये विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन प्रमुख अशोक सिंघल यांच्यासह अयोध्येला भेट दिली होती. त्यानंतर गेली ३० वर्षे अयोध्येचं संभाव्य राम मंदिर हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण या मंदिराचं आरेखन त्यांच्या कुटुंबाने केलं आहे. सोमपुरा कुटुंबाने आत्तापर्यंत सोमनाथ मंदिरासह २०० वेगवेगळी मंदिरं बांधली आहेत. पण अयोध्येमधलं राम मंदिर हे त्यातलं सगळ्यात बहुचर्चित मंदिर असणार आहे.

सी. बी. सोमपुरा, टेम्पल आर्किटेक्ट

‘सी. बी. सोमपुरा, टेम्पल आर्किटेक्ट’ ही सोमपुरा यांची कंपनी राम मंदिर उभारणीच्या प्रकल्पात पहिल्यापासून सहभागी आहे. अहमदाबादच्या गजबजलेल्या भागात सोमपुरांचं कार्यालय आहे. तिथे काही माणसं संगणकावर त्रिमिती (3D) डिझाइनवर काम करताना दिसतात. भव्य अशा राम मंदिराचे डिझाइन करण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने १८ जुलै रोजी मान्यता दिली आहे. आशीष हा सोमपुरा यांचा ४९ वर्षांचा मुलगा आताचा राम मंदिराचा प्रकल्प हाताळतो आहे. तो १८ जुलै रोजीच्या ट्रस्टच्या बैठकीला उपस्थित होता.

आशीष यांनी आणंद येथील बीसी पटेल स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथून आपलं स्थापत्य शिक्षण घेतलं आहे. चंद्रकांत सोमपुरा यांना त्यांची स्थापत्यशास्त्राची कौशल्यं त्यांच्या पूर्वजांकडून मिळाली आहेत. चंद्रकांत सोमपुरा यांच्याकडे आर्किटेक्चर क्षेत्रातील कोणतीही पदवी नाही, पण त्यांच्या मुला-नातवंडांनी मात्र स्थापत्यकलेचं औपचारिक शिक्षण घेतलं आहे. चंद्रकात सोमपुरा यांच्या नातवाने, आशुतोषने सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे आणि आता तो कुटुंबाच्या व्यवसायाला हातभार लावतो आहे.आशीष सोमपुरा यांना ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आमंत्रण आहे. तिथे ते मंदिर आराखडा सादर करणार आहेत. प्रस्तावित मंदिराचे डिझाइन तयार केल्यानंतर चंद्रकांत सोमपुरा सध्या अयोध्येत आहेत. डिझाइनवर अवलंबून सहाय्यक आर्किटेक्ट वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत, जेणेकरून मंदिराशी संबंधित सर्व गोष्टी एकाच वेळी तयार करता येतील. सोमपुरा यांच्या मते दगडावरील कोरीव काम ४० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. मंदिराचं बांधकाम तीन-साडेतीन वर्षांत पूर्ण होईल. पण आताच्या करोनाच्या महासाथीमुळे सहाआठ महिने जास्त लागू शकतात. मंदिर उभारणीचं काम ‘एल अ‍ॅण्ड टी’ला देण्यात आलं आहे.