ध्वनिप्रदूषण करणाऱ्या नऊ गणेश मंडळांवर पोलिसांची कारवाई; डीजे चालकांसह अध्यक्षांवर गुन्हे

पिंपरी : गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करत डीजेचा मोठ्या आवाजात वापर करणाऱ्या सांगवी परिसरातील नऊ गणेश मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली. मंडळांच्या अध्यक्षांसह डीजे चालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली. यामध्ये परिसरातील सुमारे ९० गणेश मंडळे सहभागी झाली होती. त्यापैकी नऊ मंडळांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच डीजे मिक्सर, तीन डीजे कन्सोल, तीन लॅपटॉप आणि एक लाइट कंट्रोल मशीन जप्त केले. तसेच ट्रॅक्टर, ट्रॉली आणि मोठ्या क्षमतेच्या ध्वनिवर्धकांसह संपूर्ण डीजे संच ताब्यात घेण्यात आला.
ध्वनिप्रदूषणाचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे आगामी विसर्जन मिरवणुकांमध्येही ध्वनिप्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. उच्च क्षमतेची डीजे यंत्रणा वापरल्यास ती जागेवरच जप्त केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच डीजे चालकांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली आणि सहायक पोलीस आयुक्त मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक नांदेकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
