पिंपरी चिंचवडबातम्या

पाणीपुरवठा, जलनिःसारण, दिव्यांग भवन, बस डेपो, महिला वसतिगृह, स्वच्छता व इतर नागरी सुविधांशी संबंधित निर्णय

स्थायी समितीच्या सभेत विविध महत्त्वाच्या विषयांना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची मंजुरी

पिंपरी, दिनांक १६ सप्टेंबर २०२६: मा. स्थायी समितीची साप्ताहिक सभेत शहराच्या विकासाशी निगडित तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करून स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जंगम, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर यांच्यासह समिती सदस्य तसेच पालिकेतील विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

स्थायी समिती बैठकीत पाणीपुरवठा, जलनिःसारण, दिव्यांग भवन, बस डेपो व चार्जिंग स्टेशन, महिला वसतिगृह, स्वच्छता, रस्ते, शाळा, पशुवैद्यकीय सेवा तसेच विविध नागरी सुविधांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

पाणीपुरवठा विभागांतर्गत नवी सांगवी परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली.

तसेच जलनिःसारण विभागांतर्गत जलनिःसारण नलिकांची आधुनिक पद्धतीने देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली.

मोरवाडी येथील सुमारे २४ हजार चौ. फूट क्षेत्रफळाच्या दिव्यांग भवनात विविध प्रकारच्या दिव्यांग नागरिकांसाठी थेरपी, समुपदेशन, फिजिओथेरपी, हायड्रोथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, कौशल्य व व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, ऑडिटोरियम आणि लायब्ररी यांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

या दिव्यांग भवनाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी संचालक मंडळाच्या रचनेबाबतच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली.

मौजे वाकड येथील पीएमपीएमएल बस डेपो आणि कार्यालयाची इमारत विकसित करणे तसेच बसेससाठी चार्जिंग स्टेशन प्रणाली उभारण्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या उच्चदाब भूमिगत विद्युत वाहिनी आणि वीजपुरवठ्याशी संबंधित कामांना मंजुरी देण्यात आली.

प्रभाग क्र. २५, वाकड येथे कार्यरत महिलांसाठी वसतिगृह बांधण्याच्या कामांतर्गत चालू आर्थिक वर्षातील जमा व खर्च लेखाशीर्षामध्ये आवश्यक सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.

स्वच्छ महाराष्ट्र भारत अभियानांतर्गत क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महिला बचत गटाच्या माध्यमातून शून्य कचरा (Zero Waste) प्रकल्प राबविण्यास मुदतवाढ व मंजुरी देण्यात आली.

प्रभाग क्र. ११ मधील मनपाच्या विविध कार्यक्रमांसाठी मंडप व्यवस्था करणे, तसेच प्रभाग क्र. २२, काळेवाडी आणि प्रभाग क्र. १८, चिंचवड येथील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुढील करारांना मंजुरी देण्यात आली.

शिक्षण मंडळ विभागामार्फत प्राथमिक शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची वार्षिक तत्त्वावर देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामास मान्यता देण्यात आली.

महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना मोफत बस पास देणे, तसेच ६० वर्षांवरील अंध व्यक्तींच्या सोबतीदारांना बस प्रवासाचा पास देण्याच्या योजनेअंतर्गत झालेल्या प्रत्यक्ष खर्चास मंजुरी देण्यात आली.

प्रभाग क्र. ०३, चऱ्होली येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी नवीन वीजमीटर घेण्यास आणि वीजपुरवठा कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या विविध पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये, ॲम्ब्युलन्सवर, डॉग व्हॅन आणि डॉग पार्क इत्यादी ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यासाठी एजन्सीची निवड करून कामाचे आदेश देण्यास मंजुरी देण्यात आली.

महापालिकेच्या विविध विभागांचे दैनंदिन कामकाज तसेच आगामी सार्वत्रिक निवडणूक कामकाजासाठी मतदार याद्या व इतर कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढण्याच्या कामाचा दरकरार निश्चित करून त्यास मान्यता देण्यात आली.

महापालिकेतील सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांची वेतन पडताळणी व पेन्शनविषयक प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी अनुभवी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची मानधनावर पुनर्नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली.

बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात मूलभूत नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी प्राप्त अनुदानातून शाळांमध्ये प्रयोगशाळा व वाचनालय विकसित करणे, जिम उपकरणे बसविणे आणि रुग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करणे यांसारख्या भांडवली कामांचा समावेश करण्यास मंजुरी देण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मोहिमेचा भाग म्हणून शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी संदेश, घोषवाक्ये आणि बोलकी चित्रे रंगविण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

“पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि वेळेत नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्रमुख जबाबदारी आहे. आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणीपुरवठा, जलनिःसारण, दिव्यांग कल्याण, सार्वजनिक वाहतूक, महिला सुविधा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी होऊन त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन अशाच प्रकारे सकारात्मक आणि लोकाभिमुख निर्णय घेण्यास स्थायी समिती कटिबद्ध आहे.

  • अभिषेक बारणे, सभापती – स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.