पर्युषण पर्व : एक आध्यात्मिक संस्कृती

बाहेरच्या जगात लाखो लोकांना मारून युद्धे जिंकण्यापेक्षा फक्त स्वतःच्या आत्म्यावरच विजय प्राप्त करा. तो सर्वांत मोठा विजय आहे, असा या पर्वाचा गाभा आहे. आठ दिवसांच्या या पर्वाची सांगता संवत्सरीने होते. संवत्सरी म्हणजे प्रेम आणि क्षमेचा संवेदनशील महासागर. आपल्या मित्रांनाच नाही तर शत्रूलाही माफ करून वैश्विक बंधुत्वाची विचारधारा मजबूत करणे आणि वसुधैव कुटुंबकम् तत्त्वाचा अंगीकार करणे हा या पर्वाचा हेतू. म्हणूनच सध्याच्या धार्मिक तणाव आणि असुरक्षित जीवनाच्या पार्श्वभूमीवर वात्सल्य, प्रेम, करुणा या मानवी संवेदनांना प्रोत्साहित करणारे अत्यंत विधायक व साधनशुचिता वाढविणारे हे पवित्र पर्व आहे.
- युवराज शहा
जैन धर्माच्या धार्मिक संस्कृतीमध्ये अनादी काळापासून ‘पर्युषण पर्व’हा एक आध्यात्मिक सोहळा मानला गेला आहे .धार्मिक विचारधारेत होमहवनानंतर उत्क्रांत होत गेलेली क्रूरता यामुळे धर्माच्या नावानेच माणूस हिंसाचाराकडे वळू लागला. तत्कालीन धर्मधुरिणांनी मृत्यूपश्तात जीवनाची भीती दाखवत आणि नैसर्गिक आपत्तींच्या अज्ञानाचा लाभ उठवत ईश्वरीकोपाचा आभास निर्माण करून लोकजीवनात हिंसाचाराला धर्मात मान्यता दिली. पशुबळी, नरबळी आणि हिंसाचार हा धर्मकार्याचा आणि ईश्वरास प्रसन्न करण्याचा अविभाज्य भाग बनविला. यामुळे उद्विग्न होऊन याची प्रतिक्रिया म्हणून श्रमण परंपरा अस्तित्वात आली, भगवान महावीरांनीआणि तथागत गौतम बुद्ध यांनी या नव्या वैचारिक परंपरेचे नेतृत्व केले.
मानवी अस्तित्वापासूनच त्याला स्वार्थ, रागलोभ, मत्सर, द्वेष, क्रोध, आसुरीपणा यांनी घेरले आहे. अशा अवगुणांमुळे मानवी आत्मा मलिन होत जातो. त्याला स्वच्छ ठेवण्यासाठी कुठल्याही बाह्य ईश्वरी शक्तीची गरज नसून त्याची क्षमता आपल्यातच असते आणि कर्म सिद्धांतानुसार सदकार्यातून आपण यातून मुक्ती मिळवू शकतो. आत्मा हाच परमात्मा असून, त्याच्याशी तादात्म पावण्यासाठी पर्युषण पर्वाच्या आठ दिवसांच्या काळात तुम्ही ज्ञानसाधनेतून तुम्ही परमात्म्याशी एकरूप होऊन जा.
मग तुमच्यात एक अहिंसक अवतार निर्माण होईल आणि कष्ट, व्यथा-वेदना, पीडा, पराधीनता यांच्या कचाट्यातून सुटकाकरण्याचा परम आनंदाचा राजमार्ग तुम्हाला स्वतःलाच शोधता येईल आणि यासाठीच हे पर्व पवित्र मानले गेले आहे.
मानवाची दिशाभूल करून त्याला ईश्वरी भीती दाखवून होणारा हिंसाचार रोखण्यासाठी बुद्ध आणि महावीर यांनी यासाठीच निरीश्वरवादाचे समर्थन केले. मानवाला बुद्धिप्रामाण्यवादाकडे वळविले आहे आणि नव्या श्रमण श्रावक संस्कृतीला बळ दिले आहे. महावीरांनी नंतर स्वीसमानतेचा पुरस्कार केला आणि खियांनाही साध्वी अथवा साधिका बनण्याचा अधिकारही बहाल केला आहे. पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक जिवास त्याला मिळालेला जगण्याचा हक्क निसर्गदत्त असून, तो संपविण्याचा मानवाला अधिकार नाही.
इतकेच काय मानवालासुद्धा हिंसामुक्त शांततापूर्ण सहजीवनाचा सहिष्णू अधिकार असून, अनेकांतवादानुसार त्याचा आपण आदर केला पाहिजे आणि दुसऱ्यांना दुखावणे अथवा त्याच्या शारीरिकच नव्हे; तर मानसिक दुःखास कारणीभूत होणे हासुद्धा एक हिंसाचारच आहे, असे प्रतिपादन केले आहे. पर्युषण पर्वाच्या काळात आत्मक्लेश करून आपण पापक्षालन करू शकता आणि आपल्या हातून
कळत नकळत झालेल्या अपराधांची, चुकांची विनम्रपणे माफी मागू शकता हे या पर्युषण पर्वांचे एक महत्त्व आहे.
परमताबद्दलचा जो धर्म मानवी कल्याणासाठी असून, विश्वशांती आणि अहिंसक सहजीवनाची हमी देतो, त्याच धर्माच्या नावाने माणूस आपापसांत लढू लागला आणि जगाच्या पाठीवर हजारो धर्मयुद्धे होऊ लागली. कर्मकांडाच्या नावाखाली प्रचंड रक्तपात आणि हत्याकांड झाले. या प्रकाराने उद्विग्न होऊन समता, विश्वबंधुत्व आणि शांतीची ही नवो वाट महावीरांनी जगाला दाखविली.
अपरिग्रहातून समाजवाद आणि आसक्तीमुक्त अन्य दुर्बलांना साहाय्य अनेकांतवादातून आदर आणि सहिष्णुता, अस्तेयामधून निष्कलंक जीवन पद्धती आणि सत्याचा आग्रह अशी चिरंतन विचारधारा व याची सतत जाणीव करून देण्यासाठी साधू साध्वींच्या मौलिक सुसवांदातून पर्युषण पर्वाचे अनादी कालापासून आयोजन केले जाते व आजही होत आहे. धार्मिक नियमनाच्या आधारे मानवी समूहावर नैतिक नियंत्रण ठेवणे, हाच पर्युषणपर्वाचा मुख्य हेतू असतो. हे पर्व फक्त जैनधर्मीयांसाठी नसून जगातील प्रत्येक शांतताप्रिय मानवी समाजासाठी आहे.
म्हणूनच स्वतःची स्वतःला ओळख करून देणारे हे पर्व एक प्रभावी माध्यम आहे. हे पर्व विशिष्ट धर्मीयांचे नसून समग्र मानवजातीचे पर्व आहे आणि विश्वकल्याण आणि शांततामय सहजीवनाच्या इच्छेने ओतप्रोत भरलेले आहे.
