पिंपरी चिंचवडबातम्या

‘स्वीकृत’ नगरसेवक नियुक्तीतून गटबाजी उफाळल्यानंतर आता तहकूब सभेतील १८ विषय नियमित सभेसमोर

पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरून भाजपमध्ये उफाळलेल्या तीव्र गटबाजीनंतर आता ऑगस्टच्या तहकूब सभेतील १८ विषय थेट २ सप्टेंबरच्या नियमित सभेसमोर घेण्यात आले आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीच्या प्रस्तावावरून भाजपमध्ये उफाळलेल्या गटबाजीमुळे ऑगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा तहकूब केल्यानंतर सप्टेंबर महिन्याची सभा बुधवारी (२ सप्टेंबर) आयोजित करण्यात आली आहे. तहकूब सभेतील ३१ पैकी १८ विषय सप्टेंबरच्या सभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा दप्तरी दाखल केलेला प्रस्ताव महापाैर रवी लांडगे यांनी ऑगस्ट महिन्याच्या सर्वसाधारण सभेसमाेर घेतल्याचे भाजपमध्ये तीव्र पडसाद उमटले. त्यातून महापाैरांचा विराेध असतानाही ऑगस्ट महिन्याची सभा १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे शहर विकासाचे विषय लांबणीवर पडल्याची टीका विरोधकांनी केली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर स्थायी समितीने मेट्राे मार्गिका, विद्युत बस, वाहनतळ, शाैचालय धाेरणासह यापूर्वी मंजूर केलेले विषय सप्टेंबर महिन्याच्या सभेसमाेर घेण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार, दर महिन्याची सभा १५ तारखेला घेण्याचा ठराव झालेला असताना, महापाैरांनी सप्टेंबर महिन्याची सभा आता दोन तारखेलाच आयाेजित केली आहे.


पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप सत्तेवर येऊन सहा ऑगस्ट राेजी सहा महिने पूर्ण झाले. त्यानुसार, आतापर्यंत सहा सभा झाल्या. मात्र, त्यापैकी चार वेळा सभा तहकूब करण्यात आल्या. दरम्यान, ‘महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार तहकूब सभेचे कामकाज तहकूब सभेतच पूर्ण करणे बंधनकारक आहे. एखादी सभा तीन वेळा तहकूब झाली, तर त्या सभेला गणपूर्तीचे बंधन राहत नाही. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या तहकूब सभेतील १८ विषय सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात आले आहेत. तहकूब सभेतील विषय सर्वसाधारण सभेसमोर घेता येत नाहीत,’ असे तज्ज्ञांनी सांगितले.


स्थायी समितीचा ठराव आणि महापाैरांच्या पत्रानुसार सप्टेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी दाेन वाजता आयाेजित केली आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवर तहकूब सभेतीलही विषय घेतले असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसचिव मुकेश काेळप यांनी सांगितले.