Wednesday, August 26, 2026
Latest:
पुणेबातम्यामहाराष्ट्र

पुण्यात ‘जेन झी’ला आकर्षित करण्यासाठी ‘आरएसएस’ मैदानात; ‘सामाजिक सद्भाव’ बैठकांचा धडाका

भाजपविरोधी वातावरणाची धार कमी करण्यासाठी संघाने पुण्यात ‘सामाजिक सद्भाव’ बैठकांचा धडाका सुरू केला आहे.

पुणे : काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाने पुण्यात ‘जेन झी’मध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले असताना, भाजपविरोधी वातावरणाची धार कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) पुण्यात ‘सामाजिक सद्भाव’ बैठकांचा धडाका सुरू केला आहे.

राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाने पुण्यात भाजपविरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूने तरुणांचा कल झुकत असल्याचे चित्र निर्माण झाले असताना ही बदलती परिस्थिती ओळखून आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपविरोधी वातावरणाची धार कमी करण्यासाठी संघाने पुण्यात ‘सामाजिक सद्भाव’ बैठकांचा धडाका सुरू केला आहे.

राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाला तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी संवाद साधताना पुरुषसत्ताक पद्धतीवर बोट ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, मोहनलाल खट्टर यांच्या ध्वनिचित्रफिती दाखवून भाजपविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केेला. त्याचे समाजमाध्यमांवरही पडसाद उमटले. तरुणांचे लक्ष विचलित झाल्याचे लक्षात घेऊन संघ आणि भाजपने रणनीती बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

जेन झी’ पिढीला आकर्षित करण्याचे आव्हान असताना, संघाचे तरुणांना राष्ट्रवाद, सामाजिक सलोखा आणि सेवाकार्याची ओळख करून देण्यासाठी ‘सामाजिक सद्भाव’ बैठकांचा सपाटा लावला आहे.

पुण्यात ‘सामाजिक सद्भाव’ बैठका नियमितपणे होत असतात. मात्र, आता विविध भागांत बैठका आयोजित केल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने तरुणांना आमंत्रित केले जात आहे. या बैठकांमध्ये संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करत असून, देशाचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि सध्याच्या आर्थिक-सामाजिक स्थितीवर सकारात्मक चर्चा घडवून आणली जात आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तरे देण्यासाठी तर्कशुद्ध माहिती आणि तथ्ये तरुणांसमोर मांडण्यात येत आहेत. ‘सामाजिक सद्भाव’ बैठकांच्या माध्यमातून भाजपचा जनाधार मजबूत करणे आणि ‘जेन झी’ला आपल्याकडे वळवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.


‘सामाजिक सद्भाव’ बैठकांचा हेतू काय?
‘सामाजिक सद्भाव’ बैठकांचा हेतू समाजातील सर्व घटकांमध्ये, परस्पर संवाद, समरसता आणि एकतेची भावना दृढ करणे हा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या या बैठकांमागे विविध समाजघटकांच्या प्रमुखांना एकत्र आणून त्यांच्यात सातत्यपूर्ण संवाद घडवून आणणे आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचा हेतू आहे. सामाजिक समरसता निर्माण करणे. नव्या पिढीच्या आणि तरुणांच्या मनात असणाऱ्या शंकांचे निरसन करणे, त्यांना राष्ट्रवाद आणि सामाजिक सेवाकार्याची ओळख करून देणे आणि नकारात्मक प्रचारापासून दूर करणे या हेतूने या बैठकांचे आयोजन करण्यात याे असल्याचे सांगण्यात आहे.