पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवासी सुरक्षितता व कार्यक्षमतेवर भर
६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बस पासमध्ये ५० टक्के सवलत; अपघातातील जखमींना १ लाख, मृत्यू झाल्यास ३ लाखांपर्यंत मदत; नवीन बसेस व फीडर सेवेवरही महत्त्वपूर्ण चर्चा

पुणे, दि. २४ ऑगस्ट २०२६ : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवासी सुरक्षितता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कार्यक्षमता, बस अपघातांतील नुकसानभरपाई, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, निविदा व लेखापरीक्षणासह विविध प्रशासकीय व आर्थिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
विशेषतः ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीएमएलच्या बस पासमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी बैठकीस उपस्थित राहून पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित विविध मुद्द्यांवर सूचना मांडल्या.
बैठकीस पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, स्थायी समिती सभापती श्रीनाथ भिमाले, संचालक शैलेश खेडेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आवाड यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
