पिंपरी चिंचवडबातम्या

भेसळीमुक्त महाराष्ट्रासाठी नागरिकांची जबाबदारी महत्त्वाची : तुकाराम मुंढे

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘भेसळीमुक्त महाराष्ट्र, आरोग्यदायी महाराष्ट्र’ या विषयावर तुकाराम मुंढे यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार मयुरेश कन्नूर यांनी तुकाराम मुंढे यांची प्रकट मुलाखत घेतली. अन्नातील भेसळ, नागरिकांची जबाबदारी, नैतिकता, प्रशासनाची कार्यपद्धती, कर्तव्याला दिलेले महत्त्व तसेच आपल्या प्रशासकीय प्रवासातील विविध अनुभवांवर मुंढे यांनी परखड आणि अभ्यासपूर्ण मते व्यक्त केली.

अन्नपदार्थांमधील भेसळीचा प्रश्न केवळ प्रशासनाच्या कारवाईपुरता मर्यादित नसून त्यासाठी नागरिकांची जागरूकताही तितकीच महत्त्वाची असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. अन्नाची गुणवत्ता, त्याची सुरक्षितता आणि आरोग्य याबाबत नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे. भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच समाजामध्ये प्रामाणिकपणा आणि नैतिकतेची जाणीव निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय सेवेत काम करताना कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका मुंढे यांनी मांडली. प्रशासनातील कार्यपद्धती, निर्णयक्षमता, जबाबदारी आणि नागरिकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचे महत्त्व त्यांनी आपल्या अनुभवांच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडले. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि अनुभवाधारित मांडणीमुळे कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा तुकाराम मुंढे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. NEET-UG 2024 परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या श्रावणी कुदळे, जागतिक शूटिंग स्पर्धेत रोप्यपदक मिळविणारा खेळाडू शौर्य दिलीप भरणे तसेच पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविणारा क्षितिजय प्रवीण नप्ते यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

पत्रकार शफी पठाण लिखित ‘तुकाराम’ या पुस्तकातील निवडक मजकुराचे श्रीकांत चौगुले यांनी प्रभावी अभिवाचन केले. त्यामुळे कार्यक्रमाला साहित्यिक आणि वैचारिक बाजूही लाभली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक नाना शिवले यांनी केले, तर सानिका कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामाजिक, प्रशासकीय आणि आरोग्यविषयक प्रश्नांवर थेट आणि परखड संवाद साधणाऱ्या या कार्यक्रमामुळे नागरिकांना तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कार्यपद्धतीसोबतच अन्नसुरक्षा आणि नागरिकांच्या जबाबदारीबाबत महत्त्वपूर्ण विचार ऐकण्याची संधी मिळाली.

‘भेसळीमुक्त महाराष्ट्र, आरोग्यदायी महाराष्ट्र’ या संकल्पनेसाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडावी, हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.