बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांगांना रोजगार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्याचे निःशुल्क वाटप; दिव्यांगांना स्वावलंबी होण्यास मदत होणार

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात येत आहे. सहाय्यक साधने उपलब्ध झाल्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होऊन स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी भविष्यातही अशा शिबिरांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर, जिल्हा परिषद नागपूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यातील अस्थिव्यंग व कर्णबधिर दिव्यांग व्यक्तींसाठी निःशुल्क जयपूर फूट साहित्य व सहाय्यक साधने मोजमाप व वाटप शिबिर कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, आमदार संजय भेंडे, आ. राजीव पोतदार, आ. कृपाल तुमाने, आमदार चरणसिंग ठाकूर, आ. मोहन मते, मनपा सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, सहसचिव (मुख्यमंत्री कार्यालय) आशा पठाण आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींच्या गरजेनुसार जयपूर फूट साहित्य तसेच विविध सहाय्यभूत साधनांचे मोजमाप करून त्यांचे निःशुल्क वितरण करण्यात आले. आवश्यक साधने मिळाल्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होऊन त्यांना अधिक स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिराला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालयातून दिव्यांगांसाठी अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्याची संकल्पना पुढे आली. त्यानंतर नागपूर महानगरपालिका स्तरावर आवश्यक तयारी करण्यात आली. भगवान महावीर विकलांग सहायता समितीने या आयोजनासाठी विशेष योगदान दिले आहे. ही समिती 1975 पासून दिव्यांगांसाठी कार्यरत असून ‘जयपूर फूट’च्या माध्यमातून दिव्यांगांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविण्याचे काम करीत असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. राज्य शासनाकडूनही दिव्यांगांना आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिव्यांगांसाठी मानधन 2500 रुपये करण्यात आले असून विविध योजनांच्या माध्यमातूनही त्यांना मदत केली जात आहे. घरकुलासह अन्य शासकीय योजनांमध्ये दिव्यांगांना प्राधान्य कसे देता येईल, याबाबत शासन सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. ‘विकलांग’ऐवजी ‘दिव्यांग’ या सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांच्या क्षमतांना संधी देणे आवश्यक आहे. दिव्यांगता कमी करण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दिव्यांग व्यक्तींच्या UDID कार्डसाठी झोननिहाय कामकाज करण्यात यावे, अशी सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी शासन भविष्यातही सातत्याने काम करीत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तत्पूर्वी, महापौर नीता ठाकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी आयोजनाच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली. शिबिराच्या यशस्वी आयोजनाची माहिती देणारी ध्वनिचित्रफीतही यावेळी दाखविण्यात आली. भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे पी. आर. मेहता यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रशांत उगेमुगे आणि डॉ. विजय कुमार शर्मा यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार मनपा सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर यांनी मानले.